मुंबई : भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग फक्त त्याच्या बॉलिंगमुळेच नाही तर त्याच्या सडेतोड भूमिकेमुळेही ओळखला जातो. २०१६ साली युएईविरुद्ध हरभजन शेवटची मॅच खेळला. तेव्हापासून हरभजन भारतीय टीमबाहेर आहे. पण जेव्हाही भारतीय टीमला समर्थन करायची वेळ येते तेव्हा तो कधीच मागे हटत नाही. हरभजन सिंगबद्दल सोशल नेटवर्किंगवर एक खोटी बातमी व्हायरल झाली होती. या बातमीवर हरभजननं नाराजी जाहीर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर रोहित शर्माला खेळवण्यात आलं नाही तर मी ऑस्ट्रेलियाला पाठिंबा देईन, असं वक्तव्य हरभजननं केल्याच्या बातम्या फिरत होत्या. यावर हरभजननं ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. खोटारटी सोशल मीडिया माझ्या नावानं अशी मूर्खपणाची वक्तव्य कोण आणि कसं पसरवत आहे हे मला माहिती नाही. असले प्रकार थांबवा आणि भारतीय टीमला पाठिंबा द्या, असं ट्विट हरभजननं केलं आहे.



ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली टेस्ट ६ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये खेळवण्यात येणार आहे. या मॅचमध्ये रोहित शर्माला खेळवायचं का नाही हा प्रश्न भारतीय टीमपुढे असणार आहे. केएल राहुलचा खराब फॉर्म आणि पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त झाल्यामुळे मुरली विजयबरोबर रोहितला ओपनिंगला बॅटिंगला पाठवावं, अशीही मागणी होत आहे.


यावर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या खराब कामगिरीनंतर रोहित शर्माला टेस्ट टीममधून वगळण्यात आलं. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट टीममध्ये रोहितला संधी मिळाली नाही. ३१ वर्षांच्या रोहित शर्माची सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. पण हनुमा विहारीनं त्याच्या पदार्पणाच्याच मॅचमध्ये इंडिजविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यामध्येही विहारीनं अर्धशतक करून आपला दावा आणखी मजबूत केला.