... आणि ऑस्ट्रेलियन पत्रकारावर हरभजन भडकला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु होणाऱ्या सीरिजपूर्वीच वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे.
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु होणाऱ्या सीरिजपूर्वीच वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे.
क्रिकेटच्या मैदानात दोन देशातील क्रिकेटर्समध्ये वाद झाल्याचं तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल. मात्र, यावेळी एक वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु होणाऱ्या सीरिजपूर्वी ऑस्ट्रेलियन पत्रकार डेनिस फ्रीडमॅन याने टीका करण्यास सुरुवात केली. यानंतर या पत्रकाराला हरभजन सिंग याने प्रत्युत्तर दिलं आहे.
ऑस्ट्रेलियन पत्रकाराने विराटला म्हटलं 'स्वीपर'
ऑस्ट्रेलियन पत्रकार डेनिस फ्रीडमॅनने १२ सप्टेंबर रोजी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याला झाडूवाला असं संबोधत ट्विट केलं. हे ट्विट सोशल मीडियातही प्रचंड व्हायरल झालं. त्यानंतर टीम इंडियाचा स्पीनर हरभजन सिंग याने या प्रकरणी आपलं मत व्यक्त केलं आहे. हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियन पत्रकाराचं हे कृत्य लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे.
हरभजन सिंगने म्हटलं की, अशा प्रकारची कमेंट करणाऱ्या पत्रकाराला लाज वाटली पाहीजे. या व्यक्तीने विराट कोहलीवर अशी कमेंट करणं म्हणजे मुर्खपणा आहे. मी तर असं म्हणतो अशा प्रकारची कमेंट कुणावरही करण्याचा त्याला हक्क नाहीये. तुम्हाला तुमची प्रतिष्ठा कायम ठेवायची आहे आणि समजलीही पाहीजे. कितीही झालं तरी आपण मनुष्य आहोत, मग आपण ऑस्ट्रेलियन असो, भारतीय असो किंवा पाकिस्तानी.
मला असं वाटतं की, विराट कोहलीला यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाहीये. जेव्हा एक हत्ती गल्लीतून चालत असतो त्यावेळी कुत्रे भुंकतात. विराट कोहली हत्ती आहे आणि त्याच्यावर अशा प्रकरची टिप्पणी त्याच्यावर करणं चुकीचं आहे असेही हरभजनने म्हटलं आहे.