हरभजन सिंगनं काही वेळातच डिलीट केलं ते ट्विट
गेल्या काही काळापासून भारतीय टीमच्या बाहेर असलेला ऑफ स्पिनर हरभजन सिंग ट्विटरवर मोठ्याप्रमाणावर अॅक्टिव्ह आहे.
मुंबई : गेल्या काही काळापासून भारतीय टीमच्या बाहेर असलेला ऑफ स्पिनर हरभजन सिंग ट्विटरवर मोठ्याप्रमाणावर अॅक्टिव्ह आहे. आपल्या ट्विटमुळे हरभजन सिंग अनेकवेळा ट्रोल होतो किंवा वादात सापडतो. यावेळीही एका ट्विटमुळे हरभजन सिंग चर्चेत आला आहे. हरभजन सिंगनं ट्विटरवर श्रीलंकेच्या टीमवर विनोद केला. पण काही वेळामध्येच हरभजननं हे ट्विट डिलीट केलं. ट्विट डिलीट केल्यावरही ट्विटर यूजर्सनी हरभजनला ट्रोल केलं.
श्रीलंकेची टीम भारतामध्ये ३ टेस्ट मॅच, वनडे आणि टी-२० सीरिज खेळण्यासाठी आली आहे. याआधी भारत श्रीलंका दौऱ्यावर गेला असताना ३ टेस्ट, ५ वनडे आणि १ टी-२० अशा लागोपाठ ९ मॅचमध्ये भारताचा विजय झाला होता. आता श्रीलंकेची टीम भारत दौऱ्यावर आहे. १६ नोव्हेंबरपासून पहिल्या टेस्टला सुरुवात होत आहे.
ही सीरिज सुरु होण्याआधी हरभजन सिंगनं श्रीलंकेच्या टीमवर ट्विटरवर विनोद केला. श्रीलंका टीम सध्या त्यांच्या खराब काळातून जात आहे. झिम्बाब्वेविरुद्धही श्रीलंकेची कामगिरी निराशाजनक होती. लवकरच श्रीलंकेची टीम आंतरराष्ट्रीय स्तरावर वापसी करेल, असं ट्विट हरभजननं केलं होतं. पण थोड्यावेळातच त्यानं हे ट्विट डिलीट केलं.
श्रीलंकेला मागच्या १२ वनडे आणि ५ टी-२०मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तसंच वनडे आणि टी-२०मध्ये श्रीलंकेचा लागोपाठ १६ मॅचमध्ये पराभव झाला होता. असं असलं तरी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये यूएईमध्ये झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये श्रीलंकेनं पाकिस्तानला २-०नं हरवलं होतं.