नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्पिनर हरभजन सिंग हा भारतीय टीममध्ये नाहीये. मात्र, तो ज्याप्रमाणे मैदानात अॅक्टिव्ह असतो अगदी त्याच प्रमाणे तो सोशल मीडियात सध्या अॅक्टिव्ह असल्याचं पहायला मिळत आहे. हरभजन सिंग याचं एक वेगळचं रुप सर्वांना पहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी ट्विटरवर हरभजन सिंग याने एक ट्विट पाहिलं. या ट्विटमध्ये एका चार वर्षीय चिमुरडीवर उपचारांसाठी आर्थिक मदत करण्यात यावी यासंदर्भात होतं.


या मुलीचं नाव काव्या असं असून तीला मेंदूचा आजार आहे. ट्विटरच्या माध्यमातून या मुलीवर उपचारांसाठी आर्थिक मदत करण्यात यावी असं आवाहन करण्यात आलं होतं.


काव्यावर उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचं हरभजन सिंगने पाहिल्यानंतर त्याने एक पाऊल पुढे टाकत मदत करण्याचं ठरवलं. हरभजनने केवळ ट्विट न करता थेट रुग्णालयात काव्याची मदत करण्यासाठी दाखल झाला.



काव्यावर उपचारांसाठी ४६०० डॉलर (जवळपास ३ लाख रुपये) आवश्यकता असल्याचं बोललं जात आहे.



त्यानंतर हरभजनने ट्विट करत म्हटलं की, "काव्यावर उपचारांसाठी मदत करायची आहे. मला सगळी माहिती उपलब्ध करुन द्या. काव्या आपली मुलगी आहे आणि परमेश्वर तिची रक्षा करेल. आपण केवळ आपलं काम करत आहोत."


काव्यावर राजधानी दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हरभजन सिंगने काव्याला मदत करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतल्याने त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.