पांड्या बंधूंचा ट्विटरवरून एकमेकांवर निशाणा
टीम इंडियाचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे सोशल नेटवर्किंगवर चांगलेच चर्चेत असतात.
मुंबई : टीम इंडियाचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे सोशल नेटवर्किंगवर चांगलेच चर्चेत असतात. यावेळी या दोन्ही भावांनी ट्विटरवरून एकमेकांवर निशाणा साधला आहे. यासाठी या दोघांनी नेटमध्ये सराव करतानाचे व्हिडिओ शेयर केले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-२० सीरिजला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजची पांड्या बंधू जोरदार तयारी करत आहेत. हार्दिक पांड्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आराम देण्यात आला होता. तर कृणाल पांड्या टी-२० सीरिजमध्ये खेळला होता.
नेटमध्ये सराव करत असताना हार्दिक पांड्याने कृणाल पांड्याच्या बॉलिंगवर मोठे फटके मारले. सरावादरम्यान हार्दिकने हेलिकॉप्टर शॉटही मारला, तेव्हा बॉल कृणालच्या डोक्याच्या थोडा वरून गेला. त्यामुळे कृणाल थोडक्यात वाचला.
हार्दिक पांड्याने यानंतर ट्विटरवर हा व्हिडिओ शेयर केला. 'पांड्या विरुद्ध पांड्या, मोठा भाऊ कृणाल... हा राऊंड मी जिंकल्याचं वाटत आहे. माफ कर... हा बॉल तुझ्या डोक्यालाच लागला असता.' असं ट्विट हार्दिकने केलं.
हार्दिक पांड्याच्या या ट्विटला कृणालनेही दुसरा व्हिडिओ टाकून प्रत्युत्तर दिलं. या व्हिडिओमध्ये कृणालने टाकलेल्या बॉलने हार्दिकला चकवा दिला. तू हा व्हिडिओ का शेयर केला नाहीस, असा सवाल कृणालने हार्दिकला विचारला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी हार्दिक पांड्याला भुवनेश्वर कुमारच्याऐवजी संधी मिळाली आहे.
भारतीय टीम
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, केएल राहुल, मनीष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, दीपक चहर, नवदीप सैनी, खलील अहमद