मुंबई : करण जोहरचा कार्यक्रम 'कॉफी विथ करण'मध्ये क्रिकेटपटू हार्दिक पांड्यानं वादग्रस्त वक्तव्य केली. या वक्तव्यांमुळे हार्दिक पांड्याच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. हार्दिक पांड्या आणि त्याच्यासोबत कार्यक्रमात सहभागी झालेला केएल राहुल या दोघांचंही निलंबन झालं आहे. या दोघांना काय शिक्षा होणार हे अजून ठरलेलं नाही. पण या दोघांच्या चौकशीला बीसीसीआयनं सुरुवात केली आहे. या चौकशीनंतरच दोघांचं भविष्य आणि त्यांना होणाऱ्या शिक्षेचा निर्णय होईल. तोपर्यंत हे दोन्ही खेळाडू क्रिकेट खेळू शकणार नाहीत. ऑस्ट्रेलियातून परत आल्यानंतर हार्दिक पांड्या घराच्या बाहेरही पडलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना बीसीसीआयनं ऑस्ट्रेलियातली ३ वनडे मॅचची सीरिज अर्धवट सोडून भारतात परत बोलावलं. चौकशी होईपर्यंत या दोघांचं निलंबन करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला. या सगळ्या वादाचा आणखी फटका या दोन्ही क्रिकेटपटूंना बसत आहे. दोन्ही खेळाडूंच्या काही स्पॉन्सर्सनीही त्यांचा हात आखडता घेतला आहे. तर मुंबईच्या खार जिमखान्यानं हार्दिक पांड्याचं मानद सदस्यपद परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. खार जिमखान्याचे मानद महासचिव गौरव कपाडिया यांनी पीटीआयला ही माहिती दिली.


''हार्दिक पांड्याला ऑक्टोबर २०१८ साली ३ वर्षांचं मानद सदस्यत्व देण्यात आलं होतं. पण क्लबच्या समितीनं त्याचं सदस्यत्व मागे घेण्याचा निर्णय घेतला'', असं कपाडिया म्हणाले. आम्ही खेळाडूंना अशाप्रकारे सदस्यत्व देत असल्याचंही कपाडिया यांनी सांगितलं.


हार्दिक पांड्या आणि केएल राहुलच्या चौकशीला सुरुवात


हार्दिक घराबाहेर पडला नाही


जेव्हापासून हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियातून परत आला, तेव्हापासून तो घराबाहेरही पडलेला नाही. एवढच नाही तर तो आलेला कोणताही फोन घेत नाही, असं हार्दिकचे वडिल हिमांशू पांड्या यांनी सांगितलं. हार्दिक पांड्यानं मकर संक्रांतीचा सणही साजरा केला नाही. हार्दिक संक्रातीला घरी असतो तेव्हा तो पतंग नक्की उडवतो. त्याला पतंग उडवायला आवडते. यावेळी मात्र त्यानं पतंग उडवली नाही, अशी प्रतिक्रिया हार्दिकच्या वडिलांनी दिली. 


कंपनींनीही नातं तोडलं


अनेक ब्रॅण्ड्सनीदेखील हार्दिक पांड्या आणि केएल राहुलसोबतचं त्यांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याचा जिलेट कंपनीसोबत करार होता. पण आता कंपनीनं हा करार तोडला आहे. या दोघांच्याही चौकशीला बीसीसीआयनं सुरुवात केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आहे.


हार्दिक पांड्या आणि केएल राहुल या दोघांनी राहुल जोहरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. दोघांनी बीसीसीआयनं दिलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये जे उत्तर दिलं, त्यावरच राहुल जोहरी यांच्याशी चर्चा झाल्याचं आता समोर आलं आहे. या चर्चेनंतर आता राहुल जोहरी प्रशासकीय समितीला त्यांचा रिपोर्ट देतील. कॉफी विथ करण या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या खेळाडूंच्या एजंटनी दबाव आणला होता का? हा प्रश्न दोघांना विचारण्यात आला नाही.


'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात या दोन्ही खेळाडूंनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली होती. महिलांशी शरीर संबंधाबद्दल आपण आपल्या आई-वडिलांशी बोलतो, असं हार्दिक पांड्या या कार्यक्रमात बोलला होता. या सगळ्या वादानंतर दोन्ही खेळाडूंवर जोरदार टीका झाली होती. वाद वाढल्यानंतर दोन्ही खेळाडूंचं चौकशी होईपर्यंत निलंबन करण्याचा निर्णय बीसीसीआय आणि प्रशासकीय समितीनं घेतला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियातली वनडे सीरिज अर्धवट सोडून हे खेळाडू मायदेशी परतले. बीसीसीआयनं या खेळाडूंना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. यानंतर हार्दिक आणि राहुलनं बिनशर्त माफी मागितली होती. 


'कॉफी विथ करण'मध्ये काय म्हणाले पांड्या-राहुल?