हार्दिक पांड्याच्या पुनरागमनामुळे पोकळी भरली- सुनील गावसकर
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला.
माऊंट मॉनगनुई : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला. या मॅचमधून हार्दिक पांड्याने भारतीय टीममध्ये धमाकेदार पुनरागमन केलं. पांड्यानं त्याच्या फिल्डींग आणि बॉलिंगमधून आपण टीमसाठी का महत्त्वाचे आहोत ते दाखवून दिलं. त्याने तिसऱ्या मॅच मध्ये दोन विकेट घेतल्या आणि न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचा शानदार कॅच घेतला.
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी पांड्याच्या या खेळीचे कौतुक केले आहे. ते स्टार स्पोर्टस सोबत बोलताना म्हणाले की, 'पांड्या हा प्रभावशाली खेळाडू आहे. त्यामुळे अंतिम-११ खेळाडूंमध्ये तो हवाहवासा वाटतो. पांड्याच्या पुनरागमनामुळे भारतीय टीममध्ये निर्माण झालेली पोकळी भरून निघाली आहे. टीम अडचणीत असताना तो तारणहाराची भूमिका बजावत असतो'.
गावस्कर म्हणाले की, 'पांड्याने तिसऱ्या मॅचमध्ये उत्तम बॉलिंग केली. त्याने बाउंसरचा चांगल्या पद्धतीने वापर केला. चांगला फिल्डर असल्यामुळे पांड्या कठीण कॅच देखील सोपे करून पकडतो. तसंच रन आऊट देखील अगदी सहजतेने करतो, आणि उत्कृष्ट बॅटिंगही करतो'.
विराटकडूनही पांड्याचं कौतुक
हार्दिक पांड्यामुळे भारतीय टीमचं संतुलन नीट होतं. पांड्यानं आज चांगली कामगिरी केली, असं विराट म्हणाला. या मॅचमध्ये हार्दिक पांड्यानं विजय शंकरची जागा घेतली. पण विराटनं विजय शंकरचंही कौतुक केलं. विजय शंकर आणि शुभमन गिल यांच्यासारखे युवा खेळाडू टीममध्ये येत असल्यामुळे मी उत्साही असल्याची प्रतिक्रिया विराटनं दिली. पांड्या टीममध्ये नसल्यामुळे तिसरा फास्ट बॉलर खेळवण्याची नामुष्की ओढावत असल्याची खंत विराटनं याआधी बोलून दाखवली होती.
हार्दिकची कामगिरी
पुनरागमनाच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्यानं १० ओव्हरमध्ये ४५ रन देऊन २ विकेट घेतल्या. याचबरोबर हार्दिक पांड्यानं न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनचा उत्कृष्ट कॅच घेतला. पण हार्दिक पांड्याला बॅटिंगची संधी मात्र मिळाली नाही.
'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या कार्यक्रमात हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर बीसीसीआयनं दोन्ही खेळाडूंचं निलंबन केलं होतं. अखेर या दोन्ही खेळाडूंवरची बंदी मागे घेण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आणि दोन्ही खेळाडूंचा क्रिकेट खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.