हार्दिक पांड्या आणि केएल राहुलच्या चौकशीला सुरुवात
`कॉफी विथ करण` या शोमध्ये महिलांबद्दल अभद्र टिप्पणी केल्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.
मुंबई : 'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिलांबद्दल अभद्र टिप्पणी केल्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. हे दोन्ही क्रिकेटपटूंचं याआधीच चौकशी होईपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. या दोघांनी मंगळवारी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्याकडे त्यांचं म्हणणं मांडलं. बीसीसीआयनं या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याला उत्तर देताना दोन्ही क्रिकेटपटूंनी बिनशर्त माफी मागितली. यानंतर पांड्या आणि राहुलनं जोहरींशी फोनवरून आपली भूमिका स्पष्ट केली.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की ''सीईओंनी फोनवरून दोघांशी चर्चा केली. कारणे दाखवा नोटीसमध्ये जे विचारण्यात आलं, त्याबद्दलच दोन्ही क्रिकेटपटू बोलले. राहुल जोहरी उद्यापर्यंत प्रशासकीय समितीला (सीओए) त्यांचा रिपोर्ट देतील.'' खेळाडूंच्या एजंटनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दबाव आणला का? असा प्रश्न सीईओंनी खेळाडूंना विचारला नाही.
चौकशी संदर्भात प्रश्न विचारणं लोकपालच्या अधिकारात येतं. आता जेव्हा सर्वोच्च न्यायालय लोकपालची नियुक्ती करेल तेव्हाच पुढचा टप्पा सुरु होईल, असं बीसीसीआया एक अधिकारी म्हणाला.
'कॉफी विथ करण' या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी वैयक्तिक आयुष्य आणि महिलांबद्दल वादग्रस्त विधानं केली होती. यानंतर दोन्ही खेळाडूंवर टीकेची झोड उठली. वाद वाढल्यानंतर या दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलवण्यात आलं आणि त्यांचं तत्काळ निलंबन करण्यात आलं. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच दोघांच्या पुन्हा क्रिकेट खेळण्याबद्दल निर्णय होणार आहे. तोपर्यंत हे खेळाडू कोणत्याच प्रकारचं क्रिकेट खेळू शकणार नाही.
या वादानंतर दोन्ही खेळाडूंनी बिनशर्त माफी मागितली होती. यानंतर दोन्ही क्रिकेटपटूंची कारकिर्द धोक्यात टाकण्याऐवजी ते कसे सुधारतील याकडे लक्ष द्या, असं प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी बीसीसीआयला सांगितलं. खेळाडूंनी माफी मागितल्यानंतरही बीसीसीआयच्या १० सदस्यांनी या खेळाडूंच्या चौकशीसाठी लोकपाल नियुक्त करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याची मागणी केली आहे. तर प्रशासकीय समितीमध्ये असलेल्या विनोद राय यांच्या सहकारी डायना एडुल्जी यांनी प्रशासकीय समिती आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पांड्या आणि राहुलची चौकशी करावी, असं मत मांडलं आहे.