पुनरागमनाच्या मॅचमध्येच हार्दिक पांड्या अडचणीत, बीसीसीआय कारवाई करणार?
दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर असलेला हार्दिक पांड्या पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
मुंबई : दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर असलेला हार्दिक पांड्या पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. पुनरागमनाची मॅचच हार्दिक पांड्यासाठी अडचणीचं कारण ठरलं आहे. हार्दिक पांड्या डीवाय पाटील टी-२० कपमध्ये रिलायन्स १ या टीमकडून खेळत आहे. बँक ऑफ बडोदाविरुद्धच्या मॅचमध्ये पांड्याने २५ बॉलमध्ये ३८ रनची खेळी केली. यामुळे रिलायन्स १ ने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १५० रन केले.
बॅटिंग करत असताना हार्दिक पांड्या टीम इंडियाचं म्हणजेच बीसीसीआयचा लोगो असलेलं हेल्मेट घालून मैदानात उतरला. बीसीसीआयच्या नियमांनुसार कोणताही खेळाडू स्थानिक क्रिकेट खेळत असताना बीसीसीआयचा लोगो वापरू शकत नाही. बीसीसीआयचा लोगो असलेलं हेल्मेट वापरायचं असेल, तर लोगो असलेल्या भागाला टेप लावण्यात यावं, किंवा लोगो असलेला भाग झाकण्यात यावा, असे बीसीसीआयचे आदेश आहेत.
अशाप्रकारे बीसीसीआयचा लोगो वापरणं हे नियमांचं उल्लंघन आहे, त्यामुळे आता बीसीसीआय हार्दिकवर कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बीसीसीआयकडून याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
हार्दिक पांड्यासोबतच भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन हेदेखील डीवाय पाटील टी-२० स्पर्धेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत. दुखापतीमुळे हे तिन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहेत.
हार्दिक पांड्याच्या पाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली, तर शिखर धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजवेळी खांद्याला दुखापत झाली. भुवनेश्वर कुमारवरही हार्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली. भुवनेश्वर कुमार डिसेंबर २०१९ पासून टीम इंडियाकडून खेळला नाही. त्याआधीही भुवनेश्वर दुखापतींमुळे टीमच्या आत-बाहेर आहे.