Cricket News : हार्दिक पांड्याची जागा धोक्यात, रोहितच्या नेतृत्वात `हा` खेळाडू ठरतोय घातक
हार्दिक पांड्याऐवजी भारतीय संघात संधी मिळालेल्या खेळाडूने रोहित शर्माच्या नेतृत्वात आपली छाप उमटवली आहे
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धची तीन टी20 सामन्यांची (India vs New Zealand T20 Series) मालिका भारताने (Team India) दणक्यात जिंकली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूंने दमदार कामगिरी केली. हार्दिक पांड्याऐवजी (Hardik Pandya) भारतीय संघात संधी मिळालेल्या खेळाडूने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात आपली छाप उमटवली आहे. पण यामुळे हार्दिक पांड्याची संघातील जागा मात्र धोक्यात आली आहे.
जबरदस्त फॉर्मात हा खेळाडू
आयपीएलमधील (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्टार ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यरने (Vyankatesh Iyer) न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. पहिल्या दोन सामन्यात त्याला फारशी संधी मिळाली नाही. पण तिसऱ्या सामन्यात व्यंकटेशने 3 ओव्हरमध्ये अवघ्या 12 देत 1 विकेट घेतली. फलंदाजीतही त्याने कमाल केली. अवघ्या 15 चेंडूत त्याने 20 धावा केल्या. यात एका उत्तुंग षटकाराचाही समावेश होता.
या मालिकेत व्यंकटेशला आपली प्रतिभा दाखवण्याची फारशी संधी मिळाली नसल्याचे खुद्द भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने म्हटलं आहे. येत्या सामन्यांमध्ये व्यंकटेश अय्यरला खेळण्याची आणखी संधी मिळाल्यास तो मॅचविनर खेळाडू म्हणून स्वत:ला सिद्ध करु शकतो.
आयपीएलमध्ये शानदार कामगिरी
केकेआरकडून खेळणारा व्यंकटेश अय्यर धोकादायक फलंदाजी आणि घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. KKR ला IPL 2021 च्या अंतिम फेरीत नेण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. व्यंकटेश अय्यरने आयपीएल 2021 च्या 10 सामन्यांमध्ये 370 धावा केल्या आणि 3 बळी घेतले. या कामगिरीच्या जोरावर त्याने सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधलं आहे.
हार्दिकचा बॅडपॅच
दुसरीकडे, भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मात्र गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. दुबईत झालेल्या टी20 विश्वचषक सामन्यात त्याला समाधानकार कामगिरी करता आली नव्हती. याचाच फटका त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत बसला. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून त्याला डच्चू देण्यात आला.
युवा खेळाडूंनी केलं संधीचं सोनं
न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत KKR ला अंतिम फेरीत नेणारा व्यंकटेश अय्यर आणि RCB साठी IPL 2021 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा हर्षल पटेल (Harshal Patel) यांना संधी देण्यात आली. या युवा खेळाडूंना संधी देऊन रोहितने भविष्याचा संघ तयार केला आहे. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात याचा संघाला मोठा फायदा होणार आहे.