पांड्याची ही चूक भारताला महागात पडणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतली दुसरी टेस्ट ही रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे.
सेंच्युरिअन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेतली दुसरी टेस्ट ही रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या इनिंगमध्ये ३३५ रन्स केल्यानंतर भारतानं ३०७ रन्स केल्या. विराट कोहलीनं केलेल्या १५३ रन्सच्या खेळीमुळे भारताला एवढी मजल मारता आली.
भारतानं केलेल्या ३०७ रन्समुळे आता दक्षिण आफ्रिकेकडे २८ रन्सची आघाडी आहे. पण हार्दिक पांड्यानं चूक केली नसती तर कदाचीत भारताला या इनिंगमध्ये आघाडी घ्यायची संधी होती.
तिसऱ्या दिवशी कागिसो रबाडा ६८वी ओव्हर टाकत होता. पांड्यानं रबाडानं टाकलेला बॉल खेळला. पांड्या आणि विराट रन धावण्यासाठी निघाले पण पांड्यानं अर्धवट पीचवर आल्यावर रन घ्यायला नकार दिला. यानंतर पांड्या माघारी फिरला.
माघारी परतताना वर्नन फिलेंडरनं बॉल पांड्याच्या दिशेने भिरकवला आणि हा बॉल स्टंपलाही लागला. हार्दिक पांड्या क्रिजमध्ये पोहोचला होता पण याचवेळी त्यानं मोठी चूक केली. बॉल स्टंपला लागला तेव्हा पांड्याची बॅट आणि पाय हवेत होते, त्यामुळे पांड्याला आऊट देण्यात आलं.
पांड्याच्या या चुकीमुळे सोशल नेटवर्किंगवर त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे. काहींनी पांड्याची तुलना आलिया भटशी केली आहे. तर काहींना पांड्याला बेन स्टोक्स म्हणून संबोधलं आहे. बेन स्टोक्सही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये अशाच प्रकारे आऊट झाला होता.
पांड्या अशाप्रकारे आऊट झाल्यामुळे रवींद्र जडेजा खुश झाला असल्याची प्रतिक्रिया एकानं दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जडेजामुळेच पांड्या रन आऊट झाला होता.