मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएल-2022 (IPL 2022) सीझनसाठी रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. कर्णधार रोहित शर्मासह जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरॉन पोलार्ड यांना कायम ठेवण्यात आले आहे. यामध्ये हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या यांच्या नावाचा समावेश नाही. पांड्या बंधू दीर्घकाळापासून या संघाचा भाग आहेत आणि संघाचा एक महत्त्वाचे खेळाडू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिकने 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. येथून त्याने आपल्या कामगिरीने क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले. धोकादायक अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. मुंबई संघात रिटेन न झाल्यामुळे हार्दिकने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्याने असे संकेत दिले आहेत की तो या संघात परत येणार नाही.


2015, 2017, 2019, 2020 मध्ये मुंबईने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. तेव्हा हार्दिक या संघाचा महत्त्वाचा भाग होता. त्याने एक भावनिक व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “मी या आठवणी आयुष्यभर माझ्यासोबत ठेवीन. हे क्षण मी कायम माझ्याजवळ ठेवीन. मी इथं जी मैत्री केली आहे, जी नाती बांधली. त्यांचा मी सदैव ऋणी राहीन.'



हार्दिक पांड्या गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्म आणि दुखापतींमुळे त्रस्त आहे. त्याची नॉन-बॉलिंग हा चिंतेचा विषय आहे. त्याने आयपीएलमध्येही गोलंदाजी केली नाही. आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी त्याच्या गोलंदाजीची बरीच चर्चा झाली होती. वर्ल्ड कपमध्ये त्याने न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध गोलंदाजी केली असली तरी त्याला विकेट घेता आली नाही. यानंतर न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सनेही त्याला कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो हैराण झाला असून त्यामुळे त्याला गोलंदाजी करणे कठीण जात आहे.


अलीकडेच असेही वृत्त आले होते की हार्दिक पांड्याने निवडकर्त्यांना सांगितले आहे की, काही दिवस त्याला निवडीसाठी उपलब्ध मानू नका. ESPN cricinfo या वेबसाइटने आपल्या अहवालात सांगितले होते की, पांड्या पूर्णवेळ गोलंदाजी करण्यासाठी तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी त्याने निवडकर्त्यांकडे वेळ मागितला आहे.