हार्दिक पांड्याची 4.3 कोटींची फसवणूक केल्यानंतर सावत्र भावाने सोडलं मौन, म्हणाला `हा आमच्या...`
हार्दिक आणि कृणाल पांड्या यांच्या सावत्र भावाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेने अटक केली आहे. त्याने पांड्या भावांची 4 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
भारतीय क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वैभव पांड्या याने हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांची 4 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वैभव पांड्याला बेड्या ठोकल्या आहेत. व्यवसायाच्या नावाखाली त्याने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान वैभव पांड्याने याने कोर्टात सुनावणीदरम्यान हे कौटुंबिक प्रकरण असून, फक्त गैरसमज असल्याचा दावा केला आहे. वैभव पांड्याने रिमांड सुनावणीदरम्यान आपल्या वकिलाच्या माध्यमातून हा दावा केला. दरम्यान कोर्टाने त्याची पोलीस कोठडी 16 एप्रिलपर्यंत वाढवली आहे.
सोमवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) विश्वासघात, गुन्हेगारी धमकी, गुन्हेगारी कट आणि इतर संबंधित कलमांच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे. शुक्रवारी प्राथमिक पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (एस्प्लेनेड कोर्ट) एलएस पडेन यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं.
सुनावणीदरम्यान, वैभव पांड्याचे वकील निरंजन यांनी कोर्टाला सांगितलं की, 'हे आमचं कौटुंबिक प्रकरण असून, गैरसमज झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे'. प्रकरण मिटवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत.
वकिलाने पुढे सांगितलं की, आपला आशील तपासात सहकार्य करत असून जर पोलिसांना कोठडी वाढवून हवी असेल तर त्यात आमचा काही आक्षेप नाही. तपास पूर्ण झाला नसल्याचा आणि आरोपींकडून अद्याप भौतिक माहिती जप्त करण्यात आली नसल्याचा दावा करत आर्थिक शाखेने सात दिवसांची आणखी कोठडी मागितली होती.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी तपासात प्रगती झाली असून, या प्रकरणात अनेक आर्थिक बाजू असल्याने आरोपीची चौकशी करण्यासाठी आणखी वेळेची गरज असल्याचं म्हटलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव, हार्दिक आणि कृणाल यांनी 2021 मध्ये मुंबईत भागीदारीत पॉलिमर व्यवसाय सुरू केला. हार्दिक आणि कृणाल यांनी प्रत्येकी 40 टक्के भांडवलाची गुंतवणूक केली, तर वैभवने 20 टक्के गुंतवणूक केली आणि नफा-तोटाही 2:2:1 रेशिओनुसार ठरवण्यात आला होता.
वैभव व्यवसायातील दैनंदिन कामकाज हाताळेल असं ठरलं होतं. परंतु त्याने भागीदारीच्या तरतुदींचं उल्लंघन करून हार्दिक आणि कृणाल यांना न सांगता त्याच व्यवसायात गुंतलेली दुसरी कंपनी स्थापन केली. यामुळे मूळ कंपनीला नुकसान सहन करावं लागलं. हार्दिक आणि कृणालला 3 कोटींचा फटका बसला. तर दुसरीकडे वैभवचा नफा 20 ते 33 टक्के वाढला.
तसंच वैभव पांड्याने कंपनीतील 1 कोटी रुपये आपल्या खासगी खात्यात वळले. पोलिसांच्या माहितीनुसार, यामुळे हार्दिक आणि कृणाल पांड्या यांना 4 कोटींचा तोटा झाला.