Hardik Pandya Talks About His Bad Patch: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन, मुंबईचा कर्णधार होणे, आयपीएल 2024 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या वाट्याला आलेली निराशा आणि त्यानंतर पत्नीबरोबरचा कथित दुरावा या साऱ्यामुळे पांड्या सातत्याने सातत्याने चर्चेत आहे. तो बऱ्याच काळापासून नकारात्मक गोष्टींसाठीच चर्चेत आहे. मुंबईचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी राहिला. मात्र हार्दिकला टी-20 वर्ल्ड कपच्या आधी फॉर्म गवसल्याची चिन्हं बांगलादेशविरुद्ध 1 जून रोजी झालेल्या सराव सामन्यात दिसून आली. पंड्याने या सामन्यामध्ये 23 बॉलमध्ये 40 धावा केल्या. त्याने केलेली फटकेबाजी पाहून अनेकांना आधीचा हार्दिक पंड्याच आठवला. पंड्याच्या खेळीचा हातभार लागल्याने भारताने हा सराव सामना 50 धावांनी जिंकला. पंड्याने फिनिशर म्हणून उत्तम कामगिरी केली. या सामन्यानंतर पंड्याने मागील काही काळापासून सुरु असलेल्या बॅड पॅचबद्दल उघडपणे भाष्य केलं.


अशा परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मला असं वाटतं की तुम्ही सुरु असलेल्या संघर्षादरम्यान तग धरुन, टिकून राहिलं पाहिजे. काहीवेळेस आय़ुष्य अशा परिस्थितीमधून जातं जेव्हा सारं काही कठीण असतं. मात्र या संघर्षामध्ये तुम्ही मैदान सोडलं किंवा खेळ अर्ध्यात सोडून दिला तर तुम्हाला तुमच्या आवडत्या खेळाकडून अपेक्षित परिणाम अथवा हवा तसा निकाल मिळत नाहीत," असं हार्दिक टी-20 वर्ल्ड कपमधील एकमेव सराव सामन्यानंतर म्हणाला. "हो मागील काही महिन्यांतील काळ माझ्यासाठी कठीण होता. मात्र त्याचवेळी मी नेहमीप्रमाणे कृतीवर भर देणारा दृष्टीकोन ठेवला. मी अशा कठीण परिस्थितीमधून अनेकदा गेलो असून त्यामधून बाहेरही आलो आहे. मी नेहमी यामधून बाहेर येण्यासाठी जो रुटीन फॉलो करतो तेच यावेळीही केलं. मी या अशा वाईट काळातून अनेकदा बाहेर आलोय तसा आताही येईल," असा विश्वास हार्दिकने 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना व्यक्त केला.


पाच शब्दांच्या कॅप्शनसहीत पोस्ट केला फोटो


क्रिकेटपटू म्हणून सदा सर्वकाळ तुम्हाला चांगलेच दिवस पाहायला मिळत नाहीत असंही हार्दिक म्हणाला. अशा बॅड पॅचमधून बाहेर पडण्यासाठी काहीतरी चुकीचं घडतंय आणि आपल्याला आपल्या कैशल्यावर अधिक काम करुन सुधारणा केली पाहिजे या गोष्टी मान्य करणं गरजेचं असतं असं हार्दिक म्हणाला. "मला मिळालेलं यश मी फार गांभीर्याने घेत नाही. मी जे काही चांगलं केलं आहे ते मी विसरुन जातो आणि पुढे चालू लागतो. हेच मी वाईट कालावधीमध्येही करतो. मी त्यापासून दूर पळत नाही. मी जे काही घडतं ते मान वरुन करुन स्वीकारतो आणि चालत राहतो," असं हार्दिक म्हणाला. सामन्यानंतर चाहत्यांना ऑटोग्राफ देणारा फोटो पोस्ट करत पंड्याने, 'Good To Be Out There' म्हणजेच मैदानावर जाऊन बरं वाटलं अशा अर्थाची कॅप्शन दिली आहे. अनेकांनी या पोस्टवरुन हार्दिकच्या सराव सामन्यातील खेळीचं कौतुक केलं आहे.



...आणि हसत राहा


"हा काळ पण सरेल असं म्हणतात. त्यामुळे या अशा बॅड पॅचमधून बाहेर येणं सोपं आहे. हा सोपा मार्ग म्हणजे खेळत राहा आणि हे स्वीकारा की तुम्हाला तुमचं कौशल्य अधिक सुधारण्याची गरज आहे. कष्ट करत राहा. कष्ट कधीच वाया जात नाही. कष्ट करा आणि हसत राहा," असं हार्दिक या छोट्याश्या मुलाखतीच्या शेवटी म्हणाला.