`...मग मी मागेपुढे पाहणार नाही`, व्हायरल व्हिडीओवर Haris rauf ने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...
Haris rauf tweet on viral video : पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ याचा चाहत्याशी धक्काबुक्की करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर गोलंदाजाने स्पष्टीकरण दिलंय.
Haris Rauf viral video : पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ (Haris Rauf) याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. पाकिस्तानचा संघ टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून (T20 World Cup 2024) बाहेर पडल्यानंतर आता खेळाडूंवर मोठ्या प्रमाणाच टीका होताना दिसतेय. अशातच पाकिस्तान संघाच्या हॉटेलबाहेर हॅरिस रौफ चाहत्यावरच्या अंगावर धावून गेल्याचं दिसून आलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल (viral video) झाला. त्यावर आता हॅरिस रौफने ट्विट करून स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाला हॅरिस रौफ?
मी सोशल मीडियावर न आणण्याचा निर्णय घेतला, परंतु आता व्हिडिओ बाहेर आल्याने मला वाटतं की परिस्थितीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. सार्वजनिक व्यक्ती म्हणून, आम्ही लोकांकडून सर्व प्रकारचे अभिप्राय प्राप्त करण्यास आम्ही तयार आहोत. त्यांना समर्थन करण्याचा किंवा टीका करण्याचा अधिकार आहे, असं हॅरिस रौफ म्हणतो.
तरीही, जेव्हा माझ्या पालकांचा आणि माझ्या कुटुंबाचा प्रश्न येतो तेव्हा मी त्यानुसार प्रतिसाद देण्यास मागेपुढे पाहणार नाही. लोक आणि त्यांच्या कुटुंबांप्रती आदर दाखवणं महत्त्वाचं आहे, मग त्यांचा व्यवसाय कोणताही असो, असं स्पष्टीकरण हॅरिस रौफने दिलं आहे.
नेमकं काय झालं?
पाकिस्तानची टीम ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तिथं देखील पाकिस्तान टीमच्या चाहत्यांनी खेळाडूंसमोर नाराजी व्यक्त केली. एका चाहत्याने पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफ याला जाब विचारला तेव्हा हॅरिस रौफचा पारा चढल्याचं दिसून आलं. त्यावेळी हॅरिस रौफ चाहत्याच्या अंगावर धावून देखील गेला. हॅरिसची पत्नी त्याला रोखण्याचा प्रयत्न करते. तेव्हा हॅरिसने तिचे देखील हात झटकले अन् चाहत्याला मारहाण करायला गेला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतोय.
व्हिडीओमध्ये काय म्हणाला हॅरिस?
हॅरिसचं भांडण होताना हा व्हिडीओ एका व्यक्तीने शूट केला आहे. यावेळी हॅरिस संतापाने, तू तर भारतीय असशील असं म्हणतोय. शिवाय याला प्रत्युत्तर म्हणून, तो चाहता देखील मी पाकिस्तानचा आहे. असं उत्तर देतोय.