IPL 2024, Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) खेळणार असल्याने आता दिल्लीच्या संघात आनंदाचं वातावरण आहे. पण आता दिल्लीला मोठा धक्का बसलाय. दिल्लीचा सलामीवीर हॅरी ब्रुक (Harry Brook) याने आयपीएलमधून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील सहभागी झाला नव्हता. हॅरी ब्रुक पहिल्या टेस्टपूर्वीच टीमला सोडून मायदेशी परतला होता. खासगी कारणास्तव हॅरीने हा निर्णय घेतल्याचं इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सांगितलं होतं. अशातच आता हॅरी ब्रुक आयपीएल देखील खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात हॅरी ब्रूकची बेस प्राइस 1.5 कोटी रुपये होती. मात्र त्याची बोली 13.25 कोटींपर्यंत गेली. राजस्थान रॉयल्सने लिलावात ब्रूकसाठी पहिली बोली लावली होती. मात्र, राजस्थानने यंदाच्या लिलावात हॅरीला उतरवलं होतं. त्यानंतर त्याला दिल्ली कॅपिटल्सने संघात सामील करुन घेतलं. आता हॅरीच्या रुपात दिल्लीला धडाकेबाज सलामीवीर मिळाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता दिल्लीच्या आशा मावळल्या आहेत.


हॅरी ब्रुक बाहेर गेल्याने दिल्लीच्या संघात कोणाला सामील केलं जाईल? असा सवाल विचारला जात आहे. बदली खेळाडूची अद्याप घोषणा झाली नाही. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलसाठी बदली खेळाडू म्हणून जेक फ्रेझर-मॅकगर्कमध्ये स्वारस्य दाखवल्याची माहिती मिळाली आहे.



हॅरी ब्रुक कोण आहे?


हॅरी ब्रूकचा जन्म 22 फेब्रुवारी 1999 रोजी यॉर्कशायरमध्ये झाला. तो इंग्लंडच्या अंडर-19 संघाचा कर्णधारही राहिला आहे. २०२० मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या टी-20 ब्लास्टमध्ये ब्रूकने अप्रतिम कामगिरी केली होती. मधल्या फळीत फलंदाजी करूनही, ब्रूकने ग्रुप स्टेजमध्ये 55 च्या सरासरीने आणि 163 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. ब्रूकने 26  जानेवारी 2022 रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या T-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी हॅरी ब्रुक याची ओळख आहे.