मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. यानंतर भारतामध्ये पाकिस्तानविरुद्ध संतापाची भावना आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच पुलवामाच्या हल्ल्यामुळे दोन्ही देशातले संबंध आणखी खराब झाले आहेत. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्धची मॅच खेळू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सौरव गांगुली, हरभजन सिंग आणि अजहरुद्दीन यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमधली नियोजित मॅच १६ जूनला खेळवण्यात येईल. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये याआधीही बहिष्काराच्या घटना घडल्या आहेत.


श्रीलंकेवरचा बहिष्कार रोखण्यासाठी भारत-पाकिस्तान एकत्र


१९९६ मध्ये भारत-पाकिस्तान-श्रीलंकेमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या काळात श्रीलंकेमध्ये एलटीटीई ही दहशतवादी संघटना कार्यरत होती. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजनं सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेमध्ये क्रिकेट खेळायला नकार दिला. यामुळे आणखी काही देश श्रीलंकेत क्रिकेट खेळणार नाहीत, अशी शंका निर्माण झाली. अखेर श्रीलंकेच्या मदतीला भारत आणि पाकिस्तान धावले. या दोन्ही देशांनी त्यांची संयुक्त टीम बनवून श्रीलंकेला पाठवली. भारत-पाकिस्तानच्या या टीमचा कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन होता. ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजची टीम यानंतरही श्रीलंकेत गेल्या नाहीत. ग्रुपमधल्या बाकी टीमनी मात्र श्रीलंकेत जाऊन मॅच खेळल्या.


न्यूझीलंड-इंग्लंडचा बहिष्कार


२००३ सालच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनं सुरक्षेच्या कारणास्तव केनियाला जायला नकार दिला. तर इंग्लंडनं झिम्बाब्वेविरुद्ध त्यांच्या देशातल्या राजकीय परिस्थितीमुळे तिकडे सामना खेळला नाही. या कारणामुळे केनिया आणि झिम्बाब्वेला मॅच जिंकल्याचे पॉईंट देण्यात आले. हे पॉइंट मिळाल्यामुळे केनिया आणि झिम्बाब्वेला सुपर सिक्समध्ये जाता आलं. केनियाची टीमतर या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येही पोहोचली. तर इंग्लंडचं आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपलं.


२०११ वर्ल्ड कप 


२०११ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन हे भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमध्ये आयोजित करण्याचं ठरलं होतं. पण पाकिस्तानमधल्या असुरक्षिततेच्या कारणांमुळे या वर्ल्ड कपची एकही मॅच पाकिस्तानमध्ये ठेवण्यात आली नाही. २००९ साली पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट टीमवर दहशतवादी हल्ला झाला. यानंतर आत्तापर्यंत कोणतीच मोठी टीम पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेली नाही. श्रीलंकेच्या टीमवर झालेल्या हल्ल्यामुळेच २०११ सालच्या वर्ल्ड कपचं पाकिस्तानचं आयोजन काढून घेण्यात आलं.