मॅनचेस्टर : सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडसोबत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर टीम इंडीयाचे यावेळचे वर्ल्ड कप जिंकण्यांचे स्वप्न भंगले आहे. टीम इंडीया सोबत देशातील करोडो चाहत्यांना पराभव चटका लावून गेला. टीम इंडीया ही वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार मानली जात होती. क्रिेकेट विश्वातील दिग्गजांनी देखील यावेळच्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडीयाच्या नावावर आपली मोहर उमटवली होती. पण न्यूझीलंडसोबतच्या पराभवना नंतर साऱ्यावर पाणी फेरले. टीम इंडीयाचा हिटमॅन रोहित शर्माचा पराभवानंतर भावनिक झालेला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. आता त्याचे एक ट्विट समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघ म्हणून आम्ही साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरलो. अर्ध्या तासाचा वाईट खेळ झाला आणि वर्ल्ड कपची संधी हुकल्याचे ट्विट रोहीत शर्माने केले आहे. माझ्या भावना तीव्र आहेत आणि तुमच्याही...पण देशाभरातून अविस्मरणीय असा पाठींबा मिळाल्याचेही रोहितने म्हटले आहे.



१४ जुलैपर्यंत मँचेस्टरमध्येच 


टीम इंडिया रविवार म्हणजेच १४ जुलैपर्यंत मँचेस्टरमध्येच थांबणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार टीम इंडियाच्या परतीच्या प्रवासाची तिकीटे आरक्षित केली गेली आहेत.  काही खेळाडू १४ जुलैपर्यंत मॅनचेस्टरमध्येच थांबून त्यानंतर निघणार आहेत.  न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर लगेचच टीमची घरवापसीची तिकीटं काढण्यात आली होती. रविवारी १४ जूलैला वर्ल्ड कपची फायनल मॅच खेळली जाणार आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना रंगणार आहे. यंदाच्यावेळी क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार आहे. कारण या दोन्ही टीमना अजून एकदाही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.


वेस्ट इंडिज दौरा



दरम्यान  टीम इंडिया वर्ल्डकपनंतर वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला ३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात ३ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. टी-२० आणि वनडे सीरिजसाठी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला विश्रांतीची शक्यता आहे.