Axar Patel : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. मात्र या वर्ल्डकपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा स्पिनर अक्षर पटेल दुखापतीमुळे वर्ल्डकपच्या टीममधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आर. अश्विनला टीममध्ये संधी देण्यात आली. अक्षर अद्याप दुखापतीतून बरा झालेला नाही, ज्यामुळे तो आगामी वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये भाग घेऊ शकणार नाहीये. यानंतर सोशल मीडियावर एक स्क्रिनशॉट व्हायरल झाला असून ही पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली. मात्र यामध्ये किती तथ्य आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आणि भारतीय निवडकर्त्यांनी 28 सप्टेंबर रोजी अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनचा आगामी वर्ल्डकप 2023 साठी त्यांच्या अंतिम 15 सदस्यीय टीममध्ये अक्षर पटेलच्या जागी समावेश केला. त्यानंतर काही तासांनी अक्षर पटेलच्या इन्स्टाग्राम हँडलवरून काही वादग्रस्त पोस्ट शेअर केली गेल्याचा दावा करण्यात आला. इतकंच नाही तर त्याने नंतर ही पोस्ट डिलीट केल्याचं म्हटलं गेलं.


मात्र खरं तर अक्षर पटेलच्या इन्स्टाग्राम स्टोरीचे काही बनावट स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले असल्याचं समोर आलं होतं. या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्याने वर्ल्ड कप 2023 साठी वगळल्याबद्दल निराशा व्यक्त केलीये. 


या व्हायरल झालेल्या पोस्ट्सवरून असं समजून येत होतं की, बीसीसीआय आणि अक्षर यांच्यात सर्व काही ठीक नाहीये. मात्र आता इंस्टाग्राम पोस्टचे स्क्रिनशॉट फेक असल्याचं म्हटलं जातंय. मुळात अक्षरने अशी कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाहीये. त्यामुळे ती डिलीट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.


काय लिहिलं होतं स्क्रिनशॉटमध्ये? 


व्हायरल झालेल्या स्क्रिनशॉटमध्ये असं लिहिलं होतं की, कॉमर्सऐवजी एखाद्याने सायन्स घेतला पाहिजे. आणि चांगला पीआर घ्यावा. तर दुसऱ्या स्क्रीनशॉटमध्ये, कात्रीने हृदय कापणारा सांगाडाही होता. अक्षर अशाप्रकारे बीसीसीआयच्या निर्णयावर नाराजी दाखवत असल्याचं सर्वांनाच वाटलं.


आशिया कपदरम्यान बांगलादेशसोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात अक्षर पटेलला दुखापत झाली होती. यामुळे तो आशिया कपच्या आणि ऑस्ट्रेलिया सिरीजमधून बाहेर पडलाय. यानंतर गुरुवारी दुखापतीमुळे तो आगामी वर्ल्डकप 2023 मधून बाहेर पडला. त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनचा टीम समावेश करण्यात आला.