बंगळुरू : आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळणाऱ्या बसिल थंपीच्या नावावर सगळ्यात खराब रेकॉर्डची नोंद झाली आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक रन देण्याचा रेकॉर्ड थंपीनं केला आहे. बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये थंपीनं ४ ओव्हरमध्ये ७० रन दिल्या. या ४ ओव्हरमध्ये थंपीला एकही विकेट मिळाली नाही. बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादनं भुवनेश्वर कुमारऐवजी थंपीला संधी दिली. पण थंपीनं पहिल्या ओव्हरमध्ये १९, दुसऱ्या ओव्हरमध्ये १८, तिसऱ्या ओव्हरमध्ये १४ आणि चौथ्या ओव्हरमध्ये १९ रन दिल्या. याआधी इशांत शर्माच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. २०१३ साली इशांतनं ४ ओव्हरमध्ये एकही विकेट न घेता ६६ रन दिल्या होत्या. उमेश यादव(६५/०), संदीप शर्मा(६६/१), वरुण ऍरोन (६३/२) हे खेळाडूही या यादीमध्ये आहेत.


बंगळुरूचा रनचा डोंगर


हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूनं रनचा डोंगर उभारला. बंगळुरूनं २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून २१८ रन केल्या. एबी डिव्हिलियर्सनं ३९ बॉलमध्ये ६९ आणि मोईन अलीनं ३४ बॉलमध्ये ६५ रन केल्या. तर कॉलीन डे ग्रॅण्डहोमनं १७ बॉलमध्ये ४० रनची खेळी केली. एबी आणि मोईननं ५७ बॉलमध्ये १०७ रनची पार्टनरशीप केली.