विराटशी तुलना; पाकिस्तानचा बाबर आझम म्हणतो...
पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम याची पाकिस्तानी माध्यमांमधून भारताचा कर्णधार विराट कोहलीशी तुलना व्हायला लागली आहे.
मुंबई : पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम याची पाकिस्तानी माध्यमांमधून भारताचा कर्णधार विराट कोहलीशी तुलना व्हायला लागली आहे. पण मी विराट कोहलीच्या जवळही नाही, असं स्पष्टीकरण खुद्द बाबर आझम यानं दिलं आहे. तसंच अशाप्रकारची तुलना थांबवण्यात यावी, अशी विनंतही बाबर आझमनं केली आहे. विराट कोहलीसारखं व्हायला, मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असं बाबर आझम म्हणाला.
'लोकं माझी विराट कोहलीशी तुलना करतात, पण तो खूप मोठा खेळाडू आहे. मी सध्या त्याच्या जवळही नाही. मी नुकतीच माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे. विराटनं त्याच्या कारकिर्दीत एक टप्पा गाठला आहे,' अशी प्रतिक्रिया बाबर आझमनं पीएसएलच्या एका कार्यक्रमादरम्यान दिली.
नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली. टेस्ट, वनडे आणि टी-२० सीरिजमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. पण बाबर आझमनं या दौऱ्यामध्ये शानदार कामगिरी केली. बाबर आझमनं ३ टेस्टमध्ये २२१ रन केल्या, यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश होता. या सीरिजमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या पहिल्या ३ खेळाडूंमध्ये बाबार आझम होता. तसंच बाबार आझमनं ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये २१६ रन केल्या होत्या. वनडे सीरिजमध्येही बाबार आझम सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता.
'बाबर आझम हा भविष्यात सर्वोत्तम खेळाडू होईल. जगातल्या सर्वोत्तम ५ खेळाडूंमध्ये लवकरच बाबर आझमला स्थान मिळेल. दोन वर्षांपूर्वी मी बाबर आझम विराट कोहलीसारखाच होईल, असं म्हणलं होतं. पण बाबर आझमला त्याचा दर्जा दाखवायला वेळ लागला,' असं पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर म्हणाले.
'दोन वर्षांपूर्वी मी बाबर आझमला नेटमध्ये सराव करताना बघितलं, तेव्हा तो लहान होता. पण आता तो जास्त फिट झाला आहे. तसंच त्याच्या खेळामध्येही सुधारणा झाली आहे', असं वक्तव्य मिकी आर्थर यांनी केलं.