मुंबई : गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनची समस्या संपायचं नाव घेत नाहीये. यातच आता सुरेश रैनानेही चौथ्या क्रमांकासाठी त्याचा दावा सांगितला आहे. भारताकडून ३२२ मॅच खेळणारा रैना हा मागच्या वर्षभरापासून टीममधून बाहेर आहे. ३२ वर्षांच्या सुरेश रैनाने भारताकडून शेवटची मॅच जुलै २०१८ साली खेळली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या २ वर्षांमध्ये होणाऱ्या २ टी-२० वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन करण्यासाठी सुरेश रैना प्रयत्न करत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना रैना म्हणाला, 'मी टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकावर असू शकतो. याआधीही मी या क्रमांकावर बॅटिंग केली होती आणि चांगली कामगिरीही केली होती. पुढच्या २ वर्षात २ टी-२० वर्ल्ड कप होणार आहेत, त्यामुळे मी संधीची वाट बघत आहे.'


सुरेश रैनाने भारतासाठी २२६ वनडे, ७८ टी-२० आणि १८ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. ३ वर्षांपासून भारताची चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनची अडचण आहे. मागच्या वर्षी टीम प्रशासनाने अंबाती रायुडूला चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक संधी दिली. पण वर्ल्ड कपच्या टीममध्ये रायुडूला संधी मिळाली नाही.


वर्ल्ड कपच्या टीममध्ये चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरची निवड झाली, पण सुरुवातीला केएल राहुल या क्रमांकावर खेळला. शिखर धवनला दुखापत झाल्यानंतर राहुलने ओपनिंग केली यानंतर विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर खेळायला मिळालं. विजय शंकरलाही दुखापत झाल्यानंतर ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर पंतच खेळत आहे, पण त्याला सतत अपयश येत आहे.


ऋषभ पंतच्या अपयशावरही रैनाने प्रतिक्रिया दिली आहे. 'सध्या पंत गोंधळात दिसत आहे. तो सध्याचा त्याचा नैसर्गिक खेळ खेळत नाहीये. धोनीसारखा वरिष्ठ खेळाडू किंवा प्रशिक्षकाने पंतसोबत बोललं पाहिजे,' असं रैना म्हणाला.