`भारतात घालवलेले क्षण माझ्यासाठी नेहमीच खास`
दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्सने संपूर्ण प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्सने संपूर्ण प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासह रॉयल चॅलेंजर बंगळुरूसाठीही त्याची आयपीएल कारकीर्द संपुष्टात आली आहे. एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली परंतु तो वेगवेगळ्या देशांच्या लीग क्रिकेटमध्ये भाग घेत होता.
तर त्याच्या आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने डिव्हिलियर्सच्या चाहत्यांसाठी एक खास संदेश जारी केला आहे. यामध्ये डिव्हिलियर्स म्हणाला की, तो अर्धा भारतीय झाला आहे.
एबी डिव्हिलियर्सने या व्हिडिओद्वारे सांगितले की, तो आयुष्यभर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा फॅन राहील. तसंच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा संघ त्याच्यासाठी कुटुंबासारखा आहे. निवृत्तीच्या निर्णयाचा आपण बराच काळ विचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
एबी डिव्हिलियर्सने सांगितले की, दीर्घकाळ आयपीएल खेळल्यानंतर तो अर्धा भारतीय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत राहत असला तरी आता तो स्वत:ला अर्धा भारतीय समजतो. भारतात घालवलेले क्षण माझ्यासाठी नेहमीच खास असतील.
एबी डिव्हिलियर्सने भलेही भारतीय संघाविरुद्ध अनेक शानदार खेळी खेळल्या असतील, पण आयपीएलमध्ये बंगळुरूसाठी त्याने केलेल्या शानदार कामगिरीमुळे भारतातही त्याचे करोडो चाहते झाले आहेत. एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विराट कोहलीनेही ट्विट करत त्याला भावनिक निरोप दिला आहे.