मुंबई : वेस्ट इंडिजचे अंपायर स्टीव्ह बकनर हे त्यांच्या वादग्रस्त अंपायरिंगमुळे कायमच चर्चेत राहिले. एकेकाळी सर्वोत्तम अंपायर अशी गणना झालेल्या बकनर यांनी चुकीचे निर्णय दिल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. आपल्या वादग्रस्त कारकिर्दीवर आता स्टीव्ह बकनर यांनी भाष्यं केलं आहे. आपण सचिन तेंडुलकरला २ वेळा खोटं आऊट दिल्याचं बकनर यांनी कबूल केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बकनर यांनी २००३ साली ऑस्ट्रेलियातल्या गाबा टेस्टमध्ये जेसन गिलेस्पीच्या बॉलिंगवर सचिनला चुकीच्या पद्धतीने एलबीडब्ल्यू दिलं. तर २००५ सालीही पाकिस्तानविरुद्ध कोलकाता टेस्टमध्ये असाच प्रकार घडला. अब्दुल रझाकच्या बॉलिंगवर सचिनच्या बॅटला बॉलही लागला नसताना बकनर यांनी त्याला कॅच आऊट दिलं. 


'सचिनला मी दोन वेळा आऊट दिलं, पण ती चूक होती. कोणत्याच अंपायरला चुकीची गोष्ट करायला आवडत नाही. या गोष्टी कायम त्याच्या लक्षात राहतात आणि अंपायरची कारकिर्दही धोक्यात येऊ शकते,' असं बकनर मॅसन ऍन्ड गेस्ट्स या रेडिओ कार्यक्रमात बोलत होते.


'माणसंच चुका करतात. एकदा ऑस्ट्रेलियामध्ये मी त्याला बॉल वरून जात असतानाही एलबीडब्ल्यू दिलं. दुसऱ्यांदा भारतामध्येही विकेट कीपरकडे बॉल गेल्यावरही मी त्याला आऊट दिलं. बॅटच्या बाजूने गेल्यानंतर बॉल थोडा हलला, पण बॉलला बॅटचा स्पर्श झाला नव्हता. पण मॅच ईडन गार्डनमध्ये होती. समोर १ लाख प्रेक्षक बसलेले प्रेक्षक आवाज करत होते. या दोन चुकांमुळे मी नाराज होतो. चुका स्वीकारणं हे आयुष्याचा भागच आहे,' असं बकनर म्हणाले. 


भारताची सगळ्यात वादग्रस्त टेस्ट मॅच म्हणून २००८ सालची सिडनी टेस्ट ओळखली जाते. या टेस्ट मॅचमध्येही स्टीव्ह बकनर यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या होत्या. त्या टेस्टमध्ये बकनर यांनी भारतीय खेळाडूंना चुकीच्या पद्धतीने आऊट दिलं होतं, तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आऊट असतानाही नॉट आऊट देण्यात आलं होतं. याच टेस्ट मॅचमध्ये हरभजन सिंग आणि एन्ड्र्यू सायमंड्स यांच्यात मोठा वाद झाला होता. सिडनी टेस्टमधल्या वादानंतर भारताने बकनर अंपायर म्हणून नको, अशी मागणी आयसीसीकडे केली. आयसीसीनेही ही मागणी मान्य केली. 


क्रिकेटमध्ये सुरू झालेल्या तंत्रज्ञानाच्या वापरालाही बकनर यांनी पाठिंबा दिला आहे. डीआरएसमुळे अंपायरचा आत्मविश्वास कमी होतो का नाही? हे मला माहिती नाही. पण चुका कमी व्हायला नक्कीच मदत होते, अशी प्रतिक्रिया त्यांंनी दिली. 


'मी अंपायर असताना एखाद्या खेळाडूला चुकीच्या पद्धतीने आऊट दिलं, तर त्या रात्री मला झोप लागायची नाही. आता मात्र अंपायर सुखाची झोप घेऊ शकतात, कारण शेवटी योग्य निर्णय देण्यात येतो,' असं वक्तव्य बकनर यांनी केलं.