BCCI Contracts: मला शंका नाही की तुम्ही...; अय्यर-इशानच्या समर्थनार्थ उतरले रवी शास्त्री
BCCI Contracts: बीसीसीआयला नडणं या दोघांना चांगलंच महागात पडलंय. बीसीसीआयने सांगितल्यानंतरही हे दोघं रणजी ट्रॉफी खेळले नाहीत. दरम्यान या दोन खेळाडूंबाबत रवी शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे.
BCCI Contracts: नुकतंच बीसीसीआयने क्रिकेटर्सच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्सची घोषणा केली. बीसीसीआयच्या या कॉन्ट्रॅक्टमधून श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यावेळी बीसीसीआयला नडणं या दोघांना चांगलंच महागात पडलंय. बीसीसीआयने सांगितल्यानंतरही हे दोघं रणजी ट्रॉफी खेळले नाहीत. दरम्यान या दोन खेळाडूंबाबत रवी शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे.
अय्यर आणि इशानच्या समर्थनार्थ उतरले रवी शास्त्री
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी दरवर्षी 12 महिन्यांचा करार केला जातो. यावेळी टीम इंडियाचे माजी कोच रवि शास्त्री यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर लिहिलंय की, 'क्रिकेटच्या खेळात कमबॅक करणं तुमची भावना दर्शवतं. श्रेयस अय्यर आणि इशान किशन तुम्ही दोघांनी धैर्य राखा. आव्हानांचा सामना करा आणि आणखी मजबूत कमबॅक करा. तुमची भूतकाळातील कामगिरी खूप काही सांगून जाते. मला शंका नाही की तुम्ही एकदा शीर्षस्थानी असाल.
25 वर्षीय इशान किशनने डिसेंबर महिन्यात काही वैयक्तिक कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून माघार घेतली होती. यानंतर रणजी ट्रॉफीमध्येही त्याने भाग घेतला नाही. त्याऐवजी पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएलच्या तयारीवर त्याने भर दिला. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टनंतर टीम इंडियातून वगळल्यानंतर अय्यरने बडोद्याविरुद्धच्या मुंबईच्या रणजी उपांत्यपूर्व फेरीसाठी तो खेळला नाही. मात्र 2 मार्चपासून सुरू होणाऱ्या रणजी उपांत्य फेरीसाठी निवड झाली आहे.
बीसीसीआयच्या निर्णयावर काय म्हणाले रवी शास्त्री?
इतकंच नाही तर रवी शास्त्री यांनी बीसीसीआयचंही कौतुक केलं आहे. यावेळी रवी शास्त्री यांनी लिहिलंय की, 'वेगवान गोलंदाजीच्या कराराने खेळ बदलणाऱ्या उचललेल्या पावलाबाबत बीसीसीआय आणि जय शाह यांचं कौतुक आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियाच्या तयारीसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. टेस्ट क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटवर भर देणं हा एक चांगला मेसेज आहे जो आपल्या लाडक्या खेळाच्या भविष्यासाठी योग्य दिशा ठरवतो.
बीसीसीआयने 2023-24 या वर्षासाठी करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली. बोर्डाच्या नव्या करारात 30 खेळाडूंना स्थान देण्यात आलंय. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना अ प्लस श्रेणीत कायम ठेवले. तर अपेक्षेप्रमाणे ईशान किशन आणि श्रेयस अय्यरचं नाव वगळण्यात आले आहे. बीसीसीआय व निवड समितीचा रणजी चषक स्पर्धेत खेळण्याचा आदेश धुडकावल्यानंतर या दोघांवर बीसीसीआयने मोठी कारवाई केली आहे.