मुंबई : माझ्यामुळे धोनीचं कर्णधारपद वाचल्याचा गौप्यस्फोट बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी केला आहे. राजदीप सरदेसाई यांचं पुस्तक डेमोक्रसी इलेव्हन या पुस्तकामध्ये श्रीनिवासन यांचा गौप्यस्फोट छापण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१२मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये व्हाईट वॉश झाल्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष मोहिंदर अमरनाथ धोनीला कर्णधारपदावरून डच्चू देण्याच्या विचारात होते, पण श्रीनिवासन यांनी अध्यक्षाचा नकाराधिकार वापरून धोनीला कर्णधारपदावरून काढण्याला विरोध केला.


ज्याला तुम्ही पक्षपातीपणा म्हणता, त्याला मी सर्वोत्कृष्ठ क्रिकेटपटूला आदर देणं म्हणतो, असं श्रीनिवासन म्हणाल्याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आलाय. वर्ल्ड कप जिंकल्याच्या एका वर्षात धोनीला कर्णधारपदावरून कसं काढायचं असा सवालही श्रीनिवासन यांनी विचारलाय.


श्रीनिवासनबद्दल धोनी पहिल्यांदाच बोलला


भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेट कारकिर्दीमध्ये वादापासून लांब राहिला. २०१३ साली आयपीएलला फिक्सिंगचं ग्रहण लागलं.  मॅच फिक्सिंगप्रकरणी श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन याचा धोनीनं बचाव केल्यामुळे धोनीवर टीका करण्यात आली. धोनी आणि चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन.श्रीनिवासन यांच्या नात्यावरही मोठ्या प्रमाणात निशाणा साधण्यात आला होता.


मॅच फिक्सिंगच्या आरोपाप्रकरणी २०१३नंतर श्रीनिवासन यांची टीम चेन्नई सुपरकिंग्जवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. इंडिया सिमेंट्सचे मालक असलेले श्रीनिवासन तेव्हा चेन्नई सुपरकिंग्जबरोबरच बीसीसीआयची जबाबदारीही सांभाळत होते. यानंतर फिक्सिंगचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि समिती स्थापन करण्यात आली. त्यावेळी धोनी इंडिया सिमेंट्सचा उपाध्यक्षही होता.


फिक्सिंगचा हा वाद सुरु असताना धोनीनं मौन धारण केलं होतं. याप्रकरणावर आता पहिल्यांदाच धोनी बोलला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या बातमीनुसार याप्रकरणातलं धोनीचं मत एका पुस्तकाच्या रुपात समोर आलं आहे. लोक काय म्हणतात, काय विचार करतात यामुळे मला काहीही फरक पडत नाही. श्रीनिवासन हे अशी व्यक्ती आहेत, ज्यांनी नेहमीच क्रिकेटपटूंची मदत केली आहे, अशी प्रतिक्रिया धोनीनं दिली आहे.