लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. इनिंग आणि १५९ रननी भारताला हार पत्करावी लागली. याचबरोबर ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत २-०नं पिछाडीवर पडला आहे. चौथ्या दिवशी जेम्स अंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडनं जबरदस्त बॉलिंग करत भारतीय बॅट्समनची भंबेरी उडवली. अंडरसननं २३ रन देऊन ४ विकेट तर ब्रॉडनं ४४ रन देऊन ४ विकेट घेतल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या टेस्ट मॅचदरम्यान विराट कोहलीच्या पाठीला दुखापत झाली. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा काही भाग आणि चौथ्या दिवशी विराट कोहली फिल्डिंगला येऊ शकला नाही. मैदानामध्ये फिल्डिंगला नसल्यामुळे विराट कोहलीला दुसऱ्या इनिंगमध्ये त्याच्या नेहमीच्या चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येता आलं नाही. विराटऐवजी अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला. पाठदुखीमुळे विराट तिसरी टेस्ट खेळणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण या प्रश्नाचं उत्तर विराट कोहलीनंच दिलं आहे.


१८ ऑगस्टपासून तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. त्याआधी मी फिट होईन, असं विराट कोहली म्हणाला आहे. पाठीच्या खाली मला दुखापत झाली आहे. कामाचं ओझं आणि जास्त क्रिकेट खेळल्यामुळे ही दुखापत पुन्हा सुरु झाल्याच विराट म्हणाला. तिसरी टेस्ट सुरु व्हायला आणखी ५ दिवस बाकी आहेत. त्याआधी मी फिट होईन असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली. दुसऱ्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवावरही विराटनं भाष्य केलं आहे. लॉर्ड्सवर आम्ही पराभवाच्याच लायक होतो, असं विराट कोहली म्हणाला आहे.