युवराजनं सांगितली निवृत्तीची वेळ
गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट टीममधून बाहेर असणाऱ्या युवराज सिंगच्या निवृत्तीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.
मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजमध्येही युवराज सिंगला संधी देण्यात आली नाही. गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट टीममधून बाहेर असणाऱ्या युवराज सिंगच्या निवृत्तीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. या सगळ्या चर्चांना आता खुद्द युवराज सिंगनंच पूर्णविराम दिला आहे. 2019च्या वर्ल्ड कपपर्यंत निवृत्त व्हायचा कोणताही विचार नाही, असं वक्तव्य युवराज सिंगनं केलं आहे. 2019च्या वर्ल्ड कपनंतर निवृत्तीचा निर्णय घेईन, असं स्पष्टीकरण युवराजनं दिलं आहे.
'मेहनत घेत आहे'
मागच्या तीन फिटनेस टेस्टमध्ये मी अयशस्वी झालो. पण कालच झालेल्या टेस्टमध्ये मी पास झालो आहे. 17 वर्षानंतरही मी अयशस्वी होत आहे. पण मला अयशस्वी व्हायची भीती वाटत नाही. कारकिर्दीमध्ये मी अनेक चढ उतार झाले आहेत, असं युवराज म्हणाला.
'निवृत्तीचा निर्णय मीच घेईन'
क्रिकेटमधून निवृत्त व्हायचा निर्णय हा सर्वस्वी माझाच असेल, असं परखड मत युवराजनं व्यक्त केलं आहे. युवराज सिंग शेवटची वनडे जून 2017मध्ये तर शेवटची टी-20 फेब्रुवारी महिन्यात खेळला होता.