मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी सोमवारी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, भारतीय क्रिकेट जगासाठी खूप महत्वाचे आहे आणि आयसीसी हे सत्य स्वीकारते. बार्कले यांनी म्हटले आहे की, आयसीसी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये म्हणजेच बीसीसीआयमधील सुरू असलेला वाद मिटू शकतो. आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत बार्कले यांनी हे वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 नोव्हेंबरला आयसीसीचे नवे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी म्हटलं की, "भारत हा जागतिक क्रिकेटचा एक महत्त्वाचा भाग आहे, आयसीसीचा एक महत्वाचा सदस्य आहे. वेळोवेळी सर्व कुटुंबांप्रमाणेच आमच्यातही आंतरिक वाद होतात. परंतु मला वाटते की भारताने केवळ आयसीसीलाच नव्हे तर जागतिक क्रिकेटलाही महत्त्व दिले आहे आणि आयसीसीला भारतीय क्रिकेट आवश्यक आहे."


ते पुढे म्हणाले की, "1926 साली न्यूझीलंडसह भारत देखील त्याच वर्षी पूर्ण सदस्य झाला होता. म्हणूनच आम्ही दोघेही जवळजवळ १०० वर्षे क्रिकेट आणि आयसीसीचे सदस्य आहोत, म्हणून मला वाटते की आम्ही आम्ही संस्थेचे महत्त्वपूर्ण सदस्य आहोत आणि मला यात काही शंका नाही ते पुढेही असेच राहिल."


भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयसीसी काही वर्षांपासून विशेषत: महसूल वाटपाच्या मुद्दय़ावर झगडत आहेत. कारण आयसीसीची प्रशासकीय समिती आपल्या सदस्या देशांमध्ये हे पैसे वाटते. काही वर्षांपूर्वी एन. श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयने आयसीसीत 'बिग थ्री' नावाच्या तीन देशांचा गट स्थापन करण्यास सुरुवात केली होती. त्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे पूर्ण सदस्य होते. आयसीसीत इतर सदस्यांपेक्षा त्यांचे योगदान जास्त आहे, त्यामुळे त्यांचं अधिक भाग मिळायला हवा असे तिघांचे म्हणणे होते. पण 2015 मध्ये हा गट रद्द केला गेला होता.