दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं वर्ल्ड टी-२० स्पर्धेचं नाव बदललं आहे. २०२० साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या स्पर्धेपासून याला टी-२० वर्ल्ड कप असं संबोधलं जाईल. हे नाव दिल्यामुळे स्पर्धेची प्रतिष्ठा वाढेल आणि स्पर्धेला ५० ओव्हरचा वर्ल्ड कप आणि टेस्ट चॅम्पियनशीप एवढंच महत्त्व प्राप्त होईल, असं आयसीसीला वाटतंय. तसंच आयसीसीचे सदस्य असलेल्या सगळ्या देशांमध्ये होणाऱ्या टी-२० स्पर्धांना आंतरराष्ट्रीय दर्जा द्यायचा ठरावही आयसीसीनं पास केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांचा आणि पुरुषांचा टी-२० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये २०२० साली खेळवण्यात येईल. तेव्हापासून या स्पर्धेच्या नावात बदल होईल, असं पत्रक आयसीसीनं काढलं आहे. या स्पर्धेचं नाव बदलल्याचं स्वागत अनेक आंतरराष्ट्रीय टीमच्या कर्णधारांनी केलं आहे. २०२० साली होणारा टी-२० वर्ल्ड कप माझा शेवटचा असेल. यानंतर मी निवृत्ती घेईन, असं दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅप डुप्लेसिस म्हणाला. ५० ओव्हरचा वर्ल्ड कप ही क्रिकेटपटूसाठी सगळ्यात मोठी स्पर्धा असते, पण आता टी-२० वर्ल्ड कपलाही तेवढंच महत्त्व प्राप्त होईल. प्रत्येक खेळाडूचं वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं स्वप्न असतं. आता टी-२० वर्ल्ड कपमुळे खेळाडूंना आणखी एक संधी मिळेल, असं फॅपला वाटतं.


भारतीय पुरुष टीमचा कर्णधार विराट कोहली आणि महिला टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरनंही आयसीसीच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. टी-२० मधल्या सगळ्यात मोठ्या स्पर्धेला वर्ल्ड कपचं नाव देण्यात आलं. २००७ साली पहिल्या वर्ल्ड टी-२० मध्ये भारताचा विजय झाला होता. आता ऑस्ट्रेलियामध्ये २०२० साली होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप जिंकणं हा आमच्यासाठी मोठा क्षण असेल, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली. ही स्पर्धा पुढच्या काळामध्ये आणखी लोकप्रिय होईल, असा विश्वास हरमनप्रीत कौरनं बोलून दाखवला.