मुंबई : मायदेशात खेळणाऱ्या टीमचा फायदा लक्षात घेता परदेशी टीमला खेळपट्टी बघून बॅटिंग किंवा फिल्डिंग करण्याबाबतचा निर्णय घेऊन द्यावा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. आयसीसीच्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली पण टेस्ट क्रिकेटमधून टॉस रद्द होणार नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. अनिल कुंबळेच्या नेतृत्वात आयसीसीच्या क्रिकेट समितीची बैठक झाली. टॉस हा टेस्ट क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. मॅचची भूमिका टॉसमुळेच ठरते त्यामुळे टॉसमध्ये हस्तक्षेप करायला आयसीसीच्या समितीनं नकार दिला. अनिल कुंबळेबरोबरच माईक गेटिंग, महेला जयवर्धने, मायकल हेसन, डेविड बून हे देखील या समितीमध्ये होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी चांगल्या दर्जाच्या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या पाहिजेत, असं मत या समितीनं नोंदवलं.


खेळाडूंच्या वागणुकीवरही चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्ट यांचं निलंबन झालं. स्मिथ आणि वॉर्नरवर एका वर्षासाठी तर बँक्रॉफ्टवर ९ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली. क्रिकेटपटूंच्या मैदानातल्या गैरवर्तणुकीवरही या बैठकीत चर्चा झाली. बॉलशी छेडछाड प्रकरणात आणखी कडक कारवाई करण्यात यावी, अपमानजनक, व्यक्तीगत आणि आक्रमक शब्दांच्या वापराला उल्लंघन म्हणून घोषित करणं, विरुद्ध टीमचा सन्मान करणं आणि खेळाडूनं अपराध किंवा उल्लंघन केलं तर मॅच रेफ्रीला शिक्षा वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार देणं, अशा शिफारसी या समितीनं आयसीसीला दिल्या आहेत.


काऊंटीमध्ये आधीच टॉस रद्द


२०१६ पासूनच इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये टॉस रद्द करण्यात आला आहे. काऊंटीमध्ये पाहुण्या कर्णधाराला बॅटिंग किंवा फिल्डिंगचा निर्णय घ्यायचा असतो.


टॉस रद्द करण्याची मागणी


टेस्ट क्रिकेटमध्ये मायदेशात खेळणाऱ्या टीमला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न होत असतो. मायदेशात खेळणाऱ्या टीमच्या ताकद आणि कमजोरी पाहूनच खेळपट्ट्या बनवल्या जातात. यावरच आक्षेप घेऊन टॉस रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मायदेशात खेळणाऱ्या टीमला असा फायदा मिळवण्यापासून रोखण्यासाठी परदेशी टीमच्या कर्णधाराला पहिले बॅटिंग करायची का बॉलिंग याचा निर्णय घेऊन द्यावा आणि टॉस रद्द करावा अशी मागणी होत आहे.