दुबई : २०२० साली ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला महिलांचा टी-२० वर्ल्ड कप, तर शेवटी पुरुषांचा टी-२० वर्ल्ड कप खेळवला जाईल. महिला टी-२० वर्ल्ड कपसाठीच्या उरलेल्या दोन टीम अखेर निश्चित झाल्या आहेत. थायलंड आणि बांगलादेशने क्वालिफायरमध्ये शानदार कामगिरी करून वर्ल्ड कपमध्ये प्रवेश मिळवला आहे. बांगलादेशने स्कॉटलंडला पराभूत केलं आहे, त्यामुळे त्यांचा ग्रुप एमध्ये समावेश झाला आहे. तर १२ वर्षांपूर्वी पहिली महिला टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या थायलंडचा पहिल्यांदाच या स्पर्धेत समावेश झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रुप एमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांगलादेश आणि श्रीलंका या टीम आहेत, तर ग्रुप बीमध्ये इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि थायलंड या टीम आहेत.


महिला टी-२० वर्ल्ड कपची पहिली मॅच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २१ फेब्रुवारी २०२० ला होणार आहे. २२ फेब्रुवारीला थायलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना होईल. तर बांगलादेशची पहिली मॅच २७ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. या स्पर्धेत ८ टीमनी त्यांच्या आयसीसी क्रमवारीनुसार जागा मिळवली आहे. तर उरलेल्या २ बांगलादेश आणि थायलंडच्या टीम क्वालिफायर स्पर्धा खेळून आल्या आहेत. ८ मार्च २०२० ला आंतरराष्ट्रीय महिला दिनाला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर महिला वर्ल्ड कपची फायनल खेळवण्यात येणार आहे.


२१ फेब्रुवारी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया


२४ फेब्रुवारी- भारत विरुद्ध बांगलादेश 


२७ फेब्रुवारी- भारत विरुद्ध न्यूझीलंड


२९ फेब्रुवारी- भारत विरुद्ध श्रीलंका


२०२० सालीच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात पुरुषांचा टी-२० वर्ल्ड कपही होणार आहे. १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होईल. सुरुवातीला क्वालिफायर मॅच खेळवण्यात येणार आहेत. तर २४ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात पहिली मॅच खेळवली जाईल. याच दिवशी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातही सामना होईल.