टेस्ट चॅम्पियनशीपच्या वेळापत्रकाची आयसीसीकडून घोषणा
विश्व टेस्ट चॅम्पियनशीपच्या वेळापत्रकाची आयसीसीकडून घोषणा करण्यात आली आहे.
दुबई : विश्व टेस्ट चॅम्पियनशीपच्या वेळापत्रकाची आयसीसीकडून घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या सगळ्या देशांचं वेळापत्रक बनवण्यात आलं आहे. कोणता देश कोणत्या देशाविरुद्ध कधी, कुठे आणि किती टेस्ट मॅच खेळेल हे यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. याचबरोबर वनडे लीगच्या कार्यक्रमाचीही आयसीसीनं घोषणा केली आहे. वनडे लीगमध्ये १३ टीम १ मे २०२० ते ३१ मार्च २०२२ पर्यंत ८ सीरिज खेळेल.
टेस्ट चॅम्पियनशीपच्या सुरुवातीला भारत वेस्ट इंडिजचा दौरा करेल. या दौऱ्यामध्ये दोन टेस्ट मॅच असतील. टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये आयसीसी क्रमवारीतल्या पहिल्या ९ टीम सहभागी असतील. ही चॅम्पियनशीप १५ जुलै २०१९ ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत चालेल. भारत आणि वेस्ट इंडिजमधली सीरिज २०१९ वर्ल्ड कपनंतर लगेच सुरु होईल. टेस्ट मॅचबरोबरच भारतीय टीम या दौऱ्यात ३ वनडे आणि ३ टी-20 मॅच खेळतील. याचबरोबर २०१९ सालच्या शेवटी वेस्ट इंडिज भारत दौऱ्यावर येईल. या दौऱ्या वेस्ट इंडिज ३ टेस्ट, ५ वनडे आणि ३ टी-20 मॅच खेळेल.
वेस्ट इंडिजनंतर भारताचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर ३ टेस्ट मॅच खेळेल. ऑक्टोबर २०१९ मध्ये ही सीरिज होईल. यानंतर बांगलादेश २ टेस्ट मॅच आणि ३ टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्यासाठी भारतात येईल. बांगलादेशनंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध २ टेस्ट आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ टेस्ट मॅच खेळेल. यानंतर इंग्लंड भारताच्या दौऱ्यावर ५ टेस्ट मॅच खेळणार आहे.
भारत-पाकिस्तान मॅच नाही
टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये एकही मॅच ठेवण्यात आलेली नाही. पण फायनलमध्ये दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध खेळू शकतात. टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारत १८ मॅच खेळणार आहे. यातल्या १२ मॅच ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध आहेत.
भारत सध्या विश्व टेस्ट चॅम्पियनशीपचा विजेता आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेची सीरिज संपल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीला आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपची गदा सोपवण्यात आली होती. भारतानं लागोपाठ दोन वर्ष ही गदा स्वत:कडे ठेवली आहे. ऑक्टोबर २०१६ पासून भारतीय टीम पहिल्या क्रमांकावर आहे. कोहलीच्या नेतृत्वात जानेवारी-फेब्रुवारी २०१६ आणि ऑगस्ट २०१६ अशा दोन वेळा भारतीय टीम पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. नोव्हेंबर २००९ ते ऑगस्ट २०११ या सर्वाधिक काळ भारत पहिल्या क्रमांकावर होता. यावेळी महेंद्रसिंग धोनी भारताचा कर्णधार होता.
२०२० मध्ये वनडे लीगला सुरुवात
विश्व टेस्ट चॅम्पियनशीपबरोबरच टेस्ट खेळणारे १२ देश आणि नेदरलँड अशा १३ टीम वनडे लीगही खेळणार आहेत. १ मे २०२० ते ३१ मार्च २०२२ पर्यंत ही लीग खेळवण्यात येईल. या दोन वर्षांमध्ये सगळ्या टीम परस्पर संमतीनं टीम स्वदेश आणि परदेशात ८ सीरिज खेळतील.
भारत वनडे लीगमध्ये पहिली सीरिज जून २०२० साली श्रीलंका दौऱ्यात खेळेल. ही लीग २०२३ वर्ल्ड कप क्वालिफायर म्हणून गणली जाईल. ३१ मार्च २०२२ पर्यंत वनडे लीगमध्ये पहिल्या ८ क्रमांकावर असणाऱ्या टीम २०२३ वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय होईल. शेवटच्या ५ टीमना आयसीसी क्वालिफायर राऊंड खेळून वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय व्हायची दुसरी संधी मिळणार आहे.