ICC Men's T20I Batting Rankings: भारतीय संघासाठी टी-20 क्रिकेटमध्ये यंदाच्या वर्षी अनेक तरुण क्रिकेटपटूंनी पदार्पण केलं आहे. मात्र वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये टी-20 संघातून पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माने जे पहिल्या 3 सामन्यांमध्ये करुन दाखवलं आहे ते कोणालाच जमलं नाही. तिलक वर्माने वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्याने या पदार्पणाच्या मालिकेमध्ये एक अर्धशतक झळकावलं आहे. या 3 सामन्यामध्ये तिलक वर्माने हार्दिक पंड्या, ईशान किशन, शुभमन गिलसारख्या खेळाडूंनाही मागे टाकलं आहे.


21 स्थानांनी झेप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजेच आयसीसीच्या टी-20 रॅकिंग नव्याने जाहीर करण्यात आलं आहे. या यादीमध्ये तिलक वर्माने हार्दिक पंड्या, शुभमन गिल आणि ईशान किशनसारख्या खेळाडूंना मागे टाकलं आहे. तिलक वर्माने आयसीसी टी-20 रॅकिंगमध्ये 46 व्या स्थानी उडी घेतली आहे. या मालिकेमधील कामगिरीच्या जोरावर तिलकने तब्बल 21 स्थानांनी झेप घेतली आहे. सध्या तिलकचं रेटिंग 501 इतकं आहे. तिलकने वेस्ट इंडीजविरुद्ध सुरु असलेल्या टी-20 मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांमध्ये सातत्य कायम राखत उत्तम स्कोअर केला तर त्याच्या रँकिंगमध्ये अजून सुधारणा होईल.


तिलक वर्मा हार्दिक, ईशान, गीलपेक्षाही सरस


टी-20 संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या आयसीसीच्या टी-20 रॅकिंगमध्ये 53 व्या स्थानी आहे. त्याच्याकडे 490 रेटींग आहे. पंड्या सध्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेमध्ये संघाचं नेतृत्व करत आहेत. हार्दिक खालोखाल लगेच म्हणजेच 54 व्या क्रमांकावर ईशान किशन आहे. ईशानचं रेटींग 489 इतकं आहे. पहिल्या क्रमाकांवर भारतासाठी तिसऱ्या टी-20 मध्ये हिरो ठरलेला सूर्यकुमार यादव आहे. त्याच्यं रेटींग 907 इतकं आहे.



शुभमनची सुमार कामगिरी


शुभमन गिलच्या कामगिरीमधील सातत्य कमी झाल्याने त्याला आयसीसीच्या रँकिंगमध्ये मोठा फटका बसलाय. वर्षाच्या सुरुवातीला टी-20 फलंदाजांच्या यादीत 30 व्या स्थानी असलेला गिल आता 68 व्या स्थानी आहे. गिलकडे 435 रेटिंग आहे. मागील काही काळापासून गिलला चांगली कामगिरी करता येत नसून तो सातत्याने अपयशी ठरतोय. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सध्याच्या टी-20 मालिकेच्या पहिल्या 3 सामन्यांतही त्याला धावा करण्यात अपयश आलं आहे. आता उरलेल्या 2 सामन्यांमध्ये त्याला लय गवसते का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


तिलकने नोंदवला अनोखा विक्रम


आपल्या पदार्पणाच्या मालिकेमधील पहिल्या 3 सामन्यांमध्ये तिलक वर्माने 39, 51 आणि नाबाद 49 धावा केल्या आहेत. आपल्या पहिल्या 3 सामन्यांमध्ये 30 हून अधिक धावा करणारा तिलक वर्मा हा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी केवळ दीपक हुडाला जमली होती. त्याने आपल्या पहिल्या 3 सामन्यांमध्ये 172 धावा केलेल्या. तर तिलक वर्माने त्याच्या कारकिर्दीमधील पहिल्या 3 टी-20 सामन्यांमध्ये 139 धावा केल्या असून त्याची सरासरी 69.50 इतकी आहे.