मुंबई : टेस्ट क्रिकेटमध्ये मागचे २ दिवस रोमांचक राहिले. भारताने वेस्ट इंडिजचा ३१८ रननी पराभव केला. बुमराह आणि अजिंक्य रहाणे भारताच्या विजयाचे शिल्पकार राहिले. तर ऍशेस सीरिजच्या तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडने अविश्वसनीय विजय मिळवला. बेन स्टोक्सची वादळी खेळी या मॅचचं प्रमुख आकर्षण होती. तर न्यूझीलंडने श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानातच मात दिली. या सगळ्या मॅचमुळे आयसीसीच्या क्रमवारीतही बदल झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा कर्णधार विराट कोहली टेस्ट बॅट्समनच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथपासून विराटच्या स्थानाला धोका आहे. ऍशेस सीरिजमध्ये दोन शतक लगावणारा स्मिथ आणि विराट यांच्यात फक्त ६ पॉईंट्सचा फरक आहे. विराटचे ९१० पॉईंट्स आणि स्मिथचे ९०४ पॉईंट्स आहेत.


बॅट्समनच्या क्रमवारीत केन विलियमसन तिसऱ्या आणि चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर आहेत. अजिंक्य रहाणे २१व्या क्रमांकावरून ११व्या क्रमांकावर आला आहे. रहाणेने पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ८१ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये शतकी खेळी केली.


बॉलरच्या क्रमवारीत टॉप-५ मध्ये फक्त एक बदल झाला आहे. पॅट कमिन्स पहिल्या, कगिसो रबाडा दुसऱ्या, जेम्स अंडरसन तिसऱ्या आणि वर्नन फिलँडर चौथ्या क्रमांकावर कायम आहेत. तर न्यूझीलंडचा ट्रेन्ट बोल्ट पाचव्या क्रमांकावर आला आहे.


वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये ७ रन देऊन ५ विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहने क्रमवारीत मोठी उडी मारली आहे. बुमराह हा पहिल्यांदाच टॉप १० मध्ये पोहोचला आहे. बुमराह हा सध्या सातव्या क्रमकांवार आहे. त्याच्या खात्यात ७७४ पॉईंट्स आहेत. टेस्ट क्रिकेटमधली बुमराहची ही सर्वोत्तम क्रमवारी आहे.


टीम क्रमवारीत भारत ११३ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. न्यूझीलंड १०९ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या, ऑस्ट्रेलिया पाचव्या, श्रीलंका सहाव्या, पाकिस्तान सातव्या, वेस्ट इंडिज आठव्या, बांगलादेश नवव्या आणि झिम्बाब्वे दहाव्या क्रमांकावर आहे.