WTC 2023 Prize Money: WTC Final जिंकणारा संघ होणार कोट्याधीश! सर्व 9 संघांनाही मिळणार मोठी रक्कम
WTC 2023 Prize Money: आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या संघांना नेमकी किती रक्कम बक्षिस म्हणून दिली जाणार आहे याची घोषणा केली आहे. हा सामना 7 जूनपासून ओव्हलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
WTC Final 2023 Prize Money: इंडियन प्रमिअर लिगचा अंतिम सामना (IPL 2023 Final) 28 मे रोजी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. एकीकडे ही स्पर्धा अंतिम टप्प्यात असतानाच दुसरीकडे पुढील महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship Final) अंतिम सामन्याचीही जोरदार चर्चा आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 7 जूनपासून ओव्हलच्या मैदानावर खेळवला जणार आहे. भारतासाठी हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा दुसरा अंतिम सामना (WTC Final) असणार आहे. 2021 च्या पहिल्याच स्पर्धेत भारताला शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळणार असल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांनामध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
एकूण 31 कोटींची बक्षिसं
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची तारीख जसजशी जवळ येत आहे त्याप्रमाणे या सामन्याविषयची नवीन नवीन माहिती समोर येत आहे. आता हा सामना जिंकणाऱ्या म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होणाऱ्या संघाला किती रक्कम बक्षिस म्हणून दिली जाणार आहे याची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने केली करण्यात आली आहे. मुळात या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच देशांचे संघ मालामाल होणार आहेत. सर्व संघांना मिळून 3.8 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 31 कोटी 37 लाख 98 हजार 300 रुपये बक्षिस स्वरुपात दिले जाणार आहेत.
विजेता संघ होणार मालामाल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकणाऱ्या संघाला गदास्वरुपातील चषक मिळणार आहे. तसेच विजेत्या संघाला बक्षिस म्हणून 16 लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 13 कोटी 21 लाख 27 हजार 840 रुपये मिळणार आहेत. तर अंतिम सामना पराभूत होणाऱ्या संघाला जवळजवळ विजेत्याच्या रक्कमपेक्षा अर्धी म्हणजेच 8 लाख अमेरिकी डॉलर्सचं बक्षिस दिलं जाणार आहे. उपविजेत्या संघाला भारतीय चलनानुसार 6 कोटी 60 लाख 63 हजार 920 रुपये मिळणार आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर संघांनाही बरेच पैसे बक्षिस म्हणून दिले जाणार आहेत. मागील पर्वातही न्यूझीलंडच्या संघाला 1.6 मिलियन अमेरिकी डॉलर्सची रक्कम विजेता संघ म्हणून देण्यात आलेली.
इतर संघांनाही मिळणार पैसे
टेस्ट क्रिकेट रॅकिंगनुसार पहिले दोन संघ वगळता इतर संघांना बक्षिसाची रक्कम वाटून दिली जाणार आहे. अनुक्रमे ही रक्कम किती असेल ते पाहूयात...
> तिसऱ्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मिळणार 4.5 लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 3 कोटी 71 लाख रुपये मिळणार
> चौथ्या क्रमांकावरील इंग्लंडच्या संघाला 3.5 लाख अमेरिकी डॉलर्स मिळणार आहेत. ही रक्कम भारतीय चलनानुसार 2 कोटी 89 लाख रुपये इतकी होते.
> पाचव्या स्थानावरील श्रीलंकेला 2 लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 2 कोटी 89 लाख रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.
> तर अनुक्रमे 6, 7, 8 व्या क्रमांकावर राहिलेल्या न्यूझीलंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या संघाला प्रत्येकी एक-एक लाख रुपये म्हणजेच 89 लाख 56 हजार रुपये दिले जाणार आहेत.