Sri Lanka Cricket Suspended : भारतात खेळवली जात असलेली आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा (ICC World Cup 2023) आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. लीग सामने संपत आले असून दिवाळीनंतर सेमीफायनलची चुरस रंगेल. यादरम्यान क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे.  अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंका क्रिकेट बोर्डावर मोठी कारवाई केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाला (Sri Lanka Cricket) तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलं आहे. श्रीलंका संसदेने गुरुवारी एकमताने ठराव मंजूर केल्यानंतर आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ICC श्रीलंका क्रिकेट बोर्डावरील बंदी उठवत नाही तोपर्यंत श्रीलंकेला ICC च्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंका क्रिकेट बोर्डात सरकारी हस्तक्षेप वाढल्याने आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी श्रीलंका क्रिकेट संघ आपला शेवटचा सामना खेळला. त्यानंतर आयसीसीने ही कारवाई केली आहे. श्रीलंका संसदेने गुरुवारी एकमताने ठराव मंजूर केला यात श्रीलंका क्रिकेट बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. याला सत्ताधारी आणि विरोधकांनीही पाठिंबा दिला. क्रिकेट बोर्डाच्या या वाढत्या हस्तक्षेपामुळे आयसीसी नाराज होतं. श्रीलंका क्रिकेटने आयसीसीचा सदस्य म्हणून आपल्या दायित्वांचे उल्लंघन केलं आहे. श्रीलंका क्रिकेटने त्यांचे सर्व व्यवहार स्वतंत्र्यपणे हाताळायला हवे होते, पण श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या कारभारात सरकारी हस्तक्षेप होत होता असं आयसीसीने म्हटलं आहे. 


यासंदर्भात आयसीसीने एक निवेदन जारी केलं आहे.  यात त्यांनी म्हटलंय, निलंबनाच्या अटी आयसीसी बोर्ड योग्य वेळी ठरवेल. 21 नोव्हेंबर रोजी आयसीसी बोर्डाची बैठक होणार आहे, त्यानंतर पुढील पावले उचलली जातील. श्रीलंका पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कपचं यजमानपद भूषवणार आहे.


श्रीलंका क्रिकेट संघावर होणार परिणाम
आयसीसीच्या या कारवाईचा श्रीलंका क्रिकेटवरही परिणाम होणार आहे. जोपर्यंत ICC श्रीलंका क्रिकेट बोर्डावरील बंदी उठवत नाही तोपर्यंत श्रीलंकेला ICC च्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. या बंदीमुळे श्रीलंकेच्या फ्युचर टूर प्रोग्रामवर (एफटीपी) परिणाम होऊ शकतो.


सरकारचा क्रिकेट बोर्डात हस्तक्षेप
श्रीलंका सरकारने 6 ऑक्टोबरला श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) बरखास्त केलं. श्रीलंकेच्या चाहत्यांनी क्रिकेट बोर्डाच्या मुख्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. श्रीलंका सरकारने बोर्ड बरखास्त केल्यानंतर माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम समिती स्थापन करण्यात आली.


श्रीलंका संघाची खराब कामगिरी
दरम्यान, आयसीसी विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. नऊ सामन्यात श्रीलंकेला केवळ दोन सामने जिंकता आलेत. पॉईंटटेबलमध्ये श्रीलंका नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्ऱॉफीतही लंकेचं खेळणं अडचणीचं ठरणार आहे.