श्रीलंकेच्या दोन खेळाडूंवर आयसीसीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामधील एका खेळाडूला काही सामन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. श्रीलंका क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने गतवर्षी 15 ऑगस्टला कसोटी क्रिकेटमधून संन्यास जाहीर केला होता. पण नंतर त्याने आपला निर्णय माघारी घेतला होता. बांगलादेशविरोधातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याला समाविष्ट करुन घेतलं होतं. 22 मार्चपासून ही मालिका सुरु होणार आहे. पण त्याआधीच आयसीसीने वानिंदू हसरंगानेवर कारवाई केली आहे. यामुळे तो आगामी मालिकेत खेळू शकणार नाही. 


वानिंदू हसरंगावर आयसीसीची मोठी कारवाई 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वानिंदू हसरंगाने कसोटी मालिकेआधी बांगलादेशविरोधातील एकदिवसीय मालिका खेळली. या मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात त्याने आयसीसीच्या नियमाचं उल्लंघन केलं. हा नियम कलम 2.8 शी संबंधित आहे, ज्यामध्ये खेळाडू अम्पायरच्या निर्णयाशी असहमती दर्शवतो. 37 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. यावेळी वानिंदू हसरंगाने अम्पायरकडून टोपी खेचून घेतली आणि त्यांची खिल्ली उडवली. यामुळे त्याचे 8 गुण कमी करण्यात आले आहेत. तसंच बांगलादेशविरोधातील मालिका खेळू शकणार नाही. 


श्रीलंकेच्या कुसल मेंडिसविरोधातही कारवाई


श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसवरही कारवाई करण्यात आली आहे. तिसऱ्या सामन्याच्या शेवटी अम्पायरशी हात मिळवत असताना गैरवर्तन केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. 50 टक्के दंड आणि तीन डिमेरिट गुणांसह ही कारवाई करण्यात आली आहे. 


कुसल मेंडिसने संहितेच्या अनुच्छेद 2.13 चं उल्लंघन केलं आहे, जे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडू, पंच किंवा सामनाधिकारी यांच्या वैयक्तिक गैरवर्तनाशी संबंधित आहे. हसरंगा आणि मेंडिस या दोघांनीही आपली चूक मान्य केली आहे. 


वानिंदु हसरंगाने 2020 मध्ये कसोटी सामन्यातून श्रीलंका संघात पदार्पण केलं होतं. 2021 मध्ये त्याने संघासाठी अखेरचा कसोटी सामना खेळला होता. वानिंदु हसरंगाने श्रीलंका संघातून चार कसोटी सामने खेळले असून, एकूण 196 धावा केल्या आहेत. तसंच त्याच्या नावावर चार विकेट्सही आहेत. त्याच्या नावे एक अर्धशतक आहे. याशिवाय त्याने श्रीलंका संघाकडून 54 एकदिवसीय सामने आणि 65 टी-20 सामने खेळले आहेत.