मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केल्यामुळे क्रिकेट विश्वात मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणानंतर आयसीसीनं ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथवर एका टेस्टची बंदी घातली आहे. तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालणार असल्याची माहिती मिळत आहे.


भारतीयावर २० वर्षांची बंदी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे बॉल छेडछाड प्रकरण ताजं असतानाच आयसीसीनं एका भारतीयावर २० वर्षांची बंदी घातली आहे. झिम्बाब्वेच्या प्रथम श्रेणी क्रिकेट अधिकारी राजन नायरवर ही कारवाई करण्यात आली आहे. नायरनं झिम्बाब्वेचा कॅप्टन ग्रीम क्रेमरला लाच दिल्याप्रकरणी नायरवर २० वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.


काय आहे नेमकं प्रकरण


मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हरारे मेट्रोपोलिटन क्रिकेट असोसिएशनचे ट्रेजरर आणि मार्केटिंग डायरेक्टर राजन नायरनं ग्रीम क्रेमरला ३० हजार अमेरिकन डॉलरची लाच देऊ केली. क्रेमरनं याची माहिती आयसीसीला दिली. आयसीसीनं याचवेळी चौकशीला सुरुवात केली होती.


राजन नायरवरचे आरोप योग्य


राजन नायरवर लावण्यात आलेले सगळे आरोप योग्य असल्याचं या चौकशीनंतर समोर आलं. यामुळे नायरला सगळ्या पदांवरून काढून टाकण्यात आलं. १६ जानेवारी २०१८ पासून राजन नायर याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. नायरवर झालेल्या या कारवाईचं आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी स्वागत केलं आहे. तसंच क्रेमरनंही योग्यवेळी आम्हाला माहिती दिल्यामुळे आयसीसीनं त्याचेही धन्यवाद दिले आहेत.