टी-२० क्रमवारी : केएल राहुल टॉप-१० मधला एकमेव भारतीय
आयसीसीनं नुकतीच टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे.
दुबई : आयसीसीनं नुकतीच टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय टीममध्ये पुनरगामन करणारा केएल राहुल हा एकमेव भारतीय बॅट्समन या क्रमवारीत टॉप-१० मध्ये आहे. तर अफगाणिस्तानच्या हजरतुल्लाह जजईनं तब्बल ३१ स्थानांची उडी घेतली आहे. जजई हा त्याच्या सर्वोत्तम ७व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर केएल राहुल हा या क्रमवारीत ६व्या क्रमांकावर आहे. राहुलनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये ४७ आणि ५० रनची खेळी केली. खराब फॉर्म आणि त्यानंतर कॉफी विथ करण या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राहुल टीमबाहेर होता.
आयसीसीच्या क्रमवारीत केएल राहुल ७२६ पॉइंटसह ६व्या क्रमांकावर आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली बॅट्समनच्या क्रमवारीत २ स्थान वरती १७व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर एमएस धोनी ७ स्थान वरती ५६ व्या क्रमांकावर गेला आहे.
बॉलरच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह १२ स्थानं वरती १५व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर डावखुरा स्पिनर कृणाल पांड्या १८ स्थानं वरती त्याच्या सर्वोत्तम ४३व्या क्रमांकावर गेला आहे. कुलदीप यादव २ स्थान खाली आला आहे. या क्रमवारीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये अर्धशतक आणि दुसऱ्या टी-२०मध्ये शतक करणारा ग्लेन मॅक्सवेल २ स्थान वरती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये मॅक्सवेलनं ५६ आणि दुसऱ्या मॅचमध्ये ११३ नाबाद रन केले. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच भारतात टी-२० सीरिज जिंकली.
आयसीसीच्या टीमच्या क्रमवारीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला पिछाडीवर टाकत तिसरा क्रमांक पटकावला आहे. अफगाणिस्तान या क्रमवारीत ८व्या आणि १७व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानची टीम १३५ पॉइंटसह पहिल्या क्रमांकावर आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये १३ पॉइंटचा फरक आहे.