टेस्ट क्रिकेटमधील टॉस रद्द करण्याचा आयसीसीचा विचार
कोणतीही क्रिकेट मॅच सुरु होण्यापूर्वी दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी मैदानात येतात.
मुंबई : कोणतीही क्रिकेट मॅच सुरु होण्यापूर्वी दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी मैदानात येतात. जो कर्णधार टॉस जिंकेल तो बॅटिंग करायची का फिल्डिंग करायची याचा निर्णय घेतो. कोणतीही मॅच जिंकण्यामध्ये टॉस अनेकवेळा महत्त्वाची भूमिका बजावतो. टॉस जिंकणारा कर्णधार विरुद्ध टीमची तसंच स्वत:च्या टीमची ताकद आणि कमजोरी पाहून बॅटिंग किंवा फिल्डिंगचा निर्णय घेतो. १८७७ साली जेव्हा पहिली टेस्ट खेळवण्यात आली तेव्हापासून आत्तापर्यंत प्रत्येक मॅचला टॉस झालेला आहे. घरच्या मैदानात खेळणारा कर्णधार टॉससाठीचं नाणं उडवतो अशी प्रथा आहे. पण टेस्ट क्रिकेटमधली टॉसच रद्द करण्याचा विचार आयसीसी करत आहे. टेस्ट क्रिकेट सुधारण्यासाठी आयसीसीकडून हे पाऊल उचललं जाऊ शकतं. २८ आणि २९ मे रोजी मुंबईमध्ये आयसीसीच्या क्रिकेट कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत टॉसबद्दलचा विषय येऊ शकतो.
पहिली बॅटिंग/बॉलिंग कसं ठरणार?
टेस्ट क्रिकेटमध्ये मायदेशात खेळणाऱ्या टीमला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न होत असतो. मायदेशात खेळणाऱ्या टीमच्या ताकद आणि कमजोरी पाहूनच खेळपट्ट्या बनवल्या जातात. यावरच आक्षेप घेऊन टॉस रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मायदेशात खेळणाऱ्या टीमला असा फायदा मिळवण्यापासून रोखण्यासाठी परदेशी टीमच्या कर्णधाराला पहिले बॅटिंग करायची का बॉलिंग याचा निर्णय घेऊन द्यावा, असा प्रस्ताव या बैठकीत दिला जाऊ शकतो. क्रिकेट कमिटीमध्ये असलेल्या काही सदस्यांचं मत टॉस रद्द करावा असं आहे.
कोण आहे क्रिकेट कमिटीमध्ये?
आयसीसीच्या क्रिकेट कमिटीमध्ये अनिल कुंबळे, ऍन्ड्र्यू स्ट्राऊस, महेला जयवर्धने, राहुल द्रविड, टीम मे, न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ डेव्हिड व्हाईट, अंपायर रिचर्ड कॅटलबर्ग, आयसीसीचे मॅच रेफ्री रंजन मदुगले, शेन पोलॉक आणि क्लेर कॉनर यांचा समावेश आहे.
काऊंटीमध्ये आधीच टॉस रद्द
२०१६ पासूनच इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये टॉस रद्द करण्यात आला आहे. काऊंटीमध्ये पाहुण्या कर्णधाराला बॅटिंग किंवा फिल्डिंगचा निर्णय घ्यायचा असतो.
कधीपासून होणार अंमलबजावणी?
आयसीसीच्या बैठकीत टॉस रद्द करण्याचा निर्णय झाला तर २०२१ पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपपासून याला सुरुवात होऊ शकते.