दुबई : भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत २०१८ हे वर्ष कधीही विसरणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंत सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ कसोटी सामन्यांमध्ये पंतनं ३५८ धावा केल्या होत्या. या कसोटी मालिकेत भारताचा २-१नं विजय झाला. ऑस्ट्रेलियामध्ये भारतानं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. या कामगिरीमुळे ऋषभ पंतनं फक्त कसोटी क्रिकेटमध्ये त्याचं स्थान पक्कं केलं नाही, तर वर्ल्ड कपसाठीच्या संघामध्येही त्याची निवड होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियामध्ये अशी दमदार कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतचा आयसीसीकडूनही सन्मान करण्यात आला आहे. ऋषभ पंतला आयसीसीनं उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार दिला आहे. मंगळवारी आयसीसीनं २०१८ वर्षासाठीच्या वेगवेगळ्या पुरस्कारांची घोषणा केली. ऋषभ पंतला हा पुरस्कार देताना मात्र आयसीसीनं त्याच्यावर निशाणा साधला.


चॅम्पियन बेबी सीटर आणि चॅम्पियन क्रिकेटपटू. ऋषभ पंतला उदयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार, असं ट्विट आयसीसीनं केलं आहे.



ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये मेलबर्न कसोटी दरम्यान टीम पेन आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये शब्दांची देवाणघेवाण झाली होती. एकदिवसीय संघामध्ये एमएस धोनीचं पुनरागमन झालं आहे. त्यामुळे तू संघाच्या बाहेर गेला आहेस. तू बेबी सिटरचं काम करु शकतोस. मी पत्नीला चित्रपट दाखवायला घेऊन जाईन तेव्हा तू माझ्या मुलांच्या बेबी सिटरचं काम करशील का? असा प्रश्न पेननं पंतला विचारला होता. टीम पेनची ही वक्तव्यं स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झाली होती.


यानंतर टीम पेनची पत्नी बोनी आणि ऋषभ पंत एका फोटोमध्ये दिसले होते. बोनीनं हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. बेस्ट बेबी सिटर... ऋषभ पंत... असं कॅप्शन देऊन बोनीनं हा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये पंतच्या कडेवर एक मुलगा होता तर दुसरा मुलगा पेनची पत्नी बोनीच्या कडेवर होता.



यानंतर रोहित शर्मानंही 'बेबी सीटर' वरून ऋषभ पंतला चिमटा काढला होता. काहीच दिवसांपूर्वी बाबा झालेल्या रोहितनं त्याची मुलगी समायरासाठी ऋषभ पंतला बेबी सीटरची ऑफर दिली होती. गुड मॉर्निंग मित्रांनो... एका चांगल्या बेबी सिटरची गरज आहे. लवकर पाहिजे. ऋषभ पंत हे काम करणार असेल तर रितीकाही खुश होईल, असं ट्विट रोहित शर्मानं केलं.


ऋषभ पंतनं रोहित शर्माच्या या ट्विटला थेट उत्तर न देता यामध्ये युझवेंद्र चहलला मध्ये आणलं. ''चहल त्याचं काम नीट करत नाही का? समायराचा बेबी सिटर होणं मला नक्कीच आवडेल. रितीका सजदेह तुला शुभेच्छा'', असं ट्विट ऋषभ पंतनं केलं होतं. रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह आणि युझवेंद्र चहल हे दोघं एकमेकांना ट्विटरवर कायमच ट्रोल करत असतात, त्यामुळे ऋषभ पंतनं युझवेंद्र चहलचं नाव घेतलं.



ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऋषभ पंतची कामगिरी


७२ वर्षांमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. या ऐतिहासिक दौऱ्यामध्ये ऋषभ पंत हा ऑस्ट्रेलियात कसोटी शतक करणारा पहिला भारतीय विकेट कीपर ठरला. सिडनीमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीमध्ये पंतनं नाबाद १५९ धावांची खेळी केली होती. याचबरोबर एका कसोटीत सर्वाधिक ११ कॅच घेण्याच्या विक्रमाशीही पंतनं ऍडलेड कसोटीत बरोबरी केली होती.


कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली असली तरी पंतला एकदिवसीय सामन्यांमध्ये आत्तापर्यंत साजेसा खेळ करता आलेला नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यांमध्ये पंतनं फक्त १५५ धावा केल्या होत्या.


ऋषभ पंतबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहली याच्यावरही आयसीसीनं पुरस्कारांचा वर्षाव केला आहे. 


आयसीसीच्या तब्बल ५ अवॉर्ड्सवर विराटची बाजी