मुंबई : २०२० साली ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. १८ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण या वर्ल्ड कपआधी सराव सामन्यात भारत पाकिस्तानचा सामना घेण्याची तयारी आयसीसीने सुरु केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आयसीसी भारत-पाकिस्तान मॅचसाठी आग्रही असली तरी याबाबत त्यांनी अजूनही बीसीसीआयशी संपर्क साधलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने अशी तयारी केली असली तरी अशी विनंती फेटाळली जाण्याची शक्यता जास्त असल्याचं बीसीसीआयमधल्या एका सूत्राने सांगितलं. 'अशा प्रकारच्या कल्पना कोणाला सुचतात याबाबत आश्चर्य वाटतंय. पहिले त्यांनी दोन वर्ष आधीच टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. आता स्पर्धेत रोमांच यावा म्हणून सराव सामन्याचा घाट घातला जात आहे,' अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली.


तणावपूर्ण संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय सीरिज होत नाहीत. हे दोन्ही देश फक्त आयसीसीची स्पर्धा आणि आशिया कपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. भारताने पाकिस्तानविरुद्ध शेवटची मॅच वर्ल्ड कपमध्ये खेळली होती.


पुलवामा हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी जोर धरू लागली होती. पण तरीही या दोन्ही टीममध्ये सामना झाला. या मॅचमध्ये भारताचा विजय झाला. यासोबतच भारताने वर्ल्ड कपमधलं पाकिस्तानविरुद्धचं विजयाचं रेकॉर्ड कायम ठेवलं. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात ७ सामने झाले, या सगळ्या ७ मॅचमध्ये भारताचा विजय झाला.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातली द्विपक्षीय सीरिज २०१२च्या शेवटी झाली होती. २ टी-२० आणि ३ वनडे मॅचच्या दौऱ्यासाठी पाकिस्तानची टीम भारत दौऱ्यावर आली होती. १९९९ सालच्या कारगील युद्धानंतर भारत २००४ साली पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. १९८९ नंतर भारत २००४ साली पहिल्यांदाच पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. यानंतर पुन्हा एकदा २००६ साली भारत पाकिस्तान दौऱ्यावर गेला, यानंतर मात्र परत भारतीय टीम पाकिस्तानमध्ये गेली नाही.