मुंबई : महिला टी-२० विश्वचषकात भारतीय संघानं विजयी सलामी दिली. कर्णधार हरमनप्रीतच्या तुफानी शतकाच्या जोरावर महिला संघाला हा विजय साकारता आला. नाणेफेक जिंकून पहिल्य़ांदा फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं निर्धारित २० षटकांमध्ये ५ गडी गमावून १९५ धावांचं आव्हान न्यूझीलंडच्या संघासमोर ठेवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार हरमनप्रीतनं जोरदार फटकेबाजी करत ७ चौकार आणि ८ षटकार खेचत १०३ धावांची धडाकेबाज खेळी केली. महिला टी-२० विश्वचषकात पहिलं-वहिलं शतक झळकावण्याचं मान तिनं मिळवला.


जेमिमा रॉड्रीगेजनं ४५ चेंडूत ५९ धावा करत तिला चांगली साथ दिली. हे आव्हान पार करताना भारताच्या पूनम यादव आणि हेमलथानं किवी संघांच्या फलंदाजांना स्थिरावण्याची संधीच दिली नाही. 


या दोघांनी प्रत्येकी तीन-तीन बळी घेत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. आता भारताचा पुढचा मुकाबला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.