ICC Womens T20 World Cup : उत्कंठापूर्ण सामन्यात भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीत धडक
दमदार कामगिरी करत....
मेलबर्न : आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात ज्याप्रमाणे भारताच्या पुरुष क्रिकेट संघाची सातत्याने वाहवा होत असते, त्याचप्रमाणे आता महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीचा आलेखही झपाट्याने प्रगीपथावर आहे. सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या (ICC Women T20 World Cup) अर्थात महिला टी२० क्रिकेट सामन्याच्या स्पर्धेत भारताच्या महिला ब्रिगेडने दमदार कामगिरी करत आणखी एका उत्कंठापूर्ण सामन्यात उपांत्यफेरीत धडक मारली आहे.
न्यूझीलंडच्या संघाचा पराभव करत भारताच्या महिला क्रिकेट खेळाडूंनी उपांत्य फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या या सामन्यात भारतीय संघाने विरोधी संघाचा अर्थात न्यूझीलंडचा तीन धावांनी पराभव केला.
भारतीय संघाने दिलेल्या १३४ धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड्च्या खेळाडूंवर सुरुवातीपासून आक्रमक गोलंदाजीचा मारा करण्यात आला. परिणामी, न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच चिवट झुंज दिली. या सामन्यात भारताकडून शफाली वर्मा पुन्हा एकदा विशेष खेळाचं प्रदर्शन करुन गेली. ३४ चेंडूंमध्ये ४६ धावा करणाऱ्या शफालीने यावेळी तीन षटकार आणि ४ चौकार झळकावले.
१३४ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडच्या संघातील रेचेल प्रीस्ट हिला दुसऱ्याच षटकात परतीची वाट धरावी लागली. तिच्यामागोमाग दिप्ती शर्माने सुझी बॅट्स हिला अवघ्या ६ धावांवर त्रिफळाचीत केलं. सहाव्या षटकापर्यंत न्यूझीलंडची धावसंख्या २ गडी बाद ३० धावा इतकी होती. पुढे पुनम यादव हिने सोफी डिव्हाईनला १४ धावांवर बाद करत सामन्यावर भारतीय संघाची पकड आणखी मजबूत केली. मॅडी ग्रीन आणि कॅटी मार्टीन यांनी ४३ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय गोलंदाजीच्या माऱ्यापुढे त्यांना टीकाव धरता आला नाही.
अखेरच्या षटकामध्ये न्यूझीलंडला विजयासाठी पाच धावांची आवश्यकता होती. तेव्हाच भारताच्या शिखा पांडे हिने वाईड यॉर्कर फेकला आणि न्यूझीलंडच्या विजयाचं गणित चुकलं.