ICC Cricket World Cup 2023: क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं बिगुल वाजलंय. आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले असून पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा धुव्वा उडवला. तर दुसऱ्या सामन्यात नवख्या नेदरलँडसमोर पाकिस्तानला रडत-खडत विजय मिळवता आला. आता करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते टीम इंडियाच्या (Team India) सामन्याकडे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपची 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. भारताचा सलामीचा सामना रंगणार आहे तो बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी (India vs Australia). चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत वि. ऑस्ट्रेलिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा विश्वचषक स्पर्धा 2023 मधील हा पहिलाच सामना असून जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष या सामन्याकडे लागलंय. कारण यंदाच्या विश्वचषक जेतेपदासाठी हे दोन्ही संघ प्रबळ दावेदार मानले जातायत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सेमीफायनलसाठी निवडलेल्या चार संघातही भारत आणि ऑस्ट्रेलियाला स्थान देण्या आलं आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी हे दोन्ही संघ उत्सुक आहेत.


टीम इंडियाला मोठा धक्का
विश्वचषकातील पहिल्य सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली असली तरी सामन्यापूर्वीच टीम इंजियाला मोठा धक्का बसला आहे. जबरदस्त फॉर्मात असलेला टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल पहिला सामना खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे तो सराव सामन्यालाही उतरु शकला नाही. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सामना सुरु होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गिलची वाट पाहू असं म्हटलंय. पण शुभमन गिल खेळूच शकला नाही तर रोहित शर्माबरोबर टीम इंडियाच्या डावाची सुरुवात कोण करणार हा प्रश्न आहे. 


अशी असेल प्लेईंग इलेव्हन
शुभमन गिल खेळू शकला नाही तर टीम इंडियासमोर सलामीसाठी दोन पर्यात आहे. पहिला आहे केएल राहुल आणि दुसरा ईशान किशन. पण यात ईशान किशनचं पारडं जड आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन भारतीय डावाची सुरुवात करतील. एकदिवसीय क्रिकिटमध्ये पहिली फलंदाजी करताना ईशान किशनची कामगिरी दमदार आहे, त्याच्या नावावर एक द्विशतकही जमा आहे. त्यामुळे केएल राहुल मधल्या फळीत फलंदाजीला संधी मिळण्याची शक्यता आहे. 


तिसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचं स्थान निश्चित आहे. तर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आणि पाचव्या क्रमांकावर केएल राहुल फलंदाजीला उतरतील. अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरु शकतात.


चेन्नईच्या चिदम्बरम मैदानाची खेळपट्टी स्पीन गोलंदाजीला मदत करणारी आहे. त्यामळे टीम इंडियात तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश असू शकतो. यात रविंद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अनुभवी आर अश्विनचा समावेश असू शकतो. तीन फिरकी गोलंदाज संघात असल्याने दोन वेगवान गोलंदाजांना संधी मिळेल. यात मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह प्लेईंग इलेव्हनमध्ये असतील. तर अनुभवी मोहम्मद शमीला पहिल्या सामन्यात बेंचवरच बसावं  लागेल, 


ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.