MNS Oppose ICC World Cup 2023 India vs Pakistan Match: अंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने म्हणजेच आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. 5 ऑक्टोबरपासून भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील सर्वात हायव्होल्टेज सामना हा भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध (ICC World Cup 2023 India vs Pakistan) 15 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र भारतामध्ये पाकिस्तानच्या संघाला खेळू देण्यास राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध केला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी या संदर्भातील भूमिका मुंबईमधील पत्रकार परिषदेत मांडली.


आधी केलं ट्वीट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संदीप देशपांडेंनी विश्वचषक स्पर्धेनिमित्त पाकिस्तानला भारतात खेळू देण्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करताना पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊन खेळण्याबद्दल भाजपा आणि शिवसेनेची भूमिका काय आहे हे स्पष्ट करावं अशी मागणी केली आहे. "भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे. हे माननिय बाळासाहेबांना कदापी पटलं नसतं आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं हे तर पटूच शकत नाही. यावर भाज पा आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे," असं ट्वीट संदीप देशपांडेंनी केलं आहे. 



पत्रकार परिषदेतून मांडली भूमिका


"ज्यांनी 26/11 चा हल्ला केला, पुलवामासारखा हल्ला केला, आपल्या अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. असंख्य गोष्ट पाकिस्तान भारताविरोधात करतं. लोक म्हणतात खेळात राजकारण नको वगैरे. पण हेच पाकिस्तानी खेळाडू वेळोवेळी काश्मीरबद्दल त्यांचं मतप्रदर्शन ट्वीटरवर करत असतात. मग त्यांना वेगळं कसं ठेवता येईल?" असा प्रश्न संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषदेमध्ये विचारला. "ज्यांनी भारताला कायम पाण्यात पाहिलं आहे त्यांचं भारतात स्वागत केलं पाहिजे का? याचा विचार केला पाहिजे. केवळ हा सामन्यासंदर्भातील विषय नाही. हा सामना पाहायला पाकिस्तानमधून लोक येणार, ते त्यांचे झेंडे घेऊन येणार, ते झेंडे फडकवणार आपण देश म्हणून हे पाहणार का? सहन करणार का? याची चर्चा झाली पाहिजे. मला वाटतं की देशात यावर चर्चा झालीच पाहिजे," असं संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे.


त्यांचं भारतात स्वागत करायचं का?


"सरकार आणि विरोधी पक्षालाही हा प्रश्न आहे. 26/11 आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. काय झालं त्यावेळी हे पाहिलं आहे. पुलवामामध्ये आपले जवान शहीद झाले. बॉम्बस्फोट किती झाले याची तर गणतीच नाही देशभरात. या सगळ्यामागे कोण होता तर पाकिस्तान होता. या पाकिस्तानच्या खेळाडूंचं आपण भारतामध्ये स्वागत करायचं का? हा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला तसा हा प्रश्न देशाच्याही मनात उभा राहिला असेल," असं संदीप देशपांडेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं.


सुरक्षेच्या मुद्द्यावरुन आधीच वाद


पाकिस्तानी संघाने सुरक्षेचं कारण देत भारतामध्ये सामना खेळण्यावरुन आधीच बराच वाद घातला आहे. अगदी या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्यापासून ते दुसऱ्या ठिकाणी सामने घेण्यासंदर्भातील अनेक दावे, प्रतिदावे करण्यात आले आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाकिस्तानला विरोध केल्याने हे प्रकरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.