ICC World Cup Final : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) सलग दहा सामने जिंकत आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. पण विश्वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरण्यात मात्र टीम इंडिया अपयशी ठरली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने (Australia) फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंग या तीनही गोष्टीत वर्चस्व गाजवत टीम इंडियाचा पराभव केला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ट्रॅव्हिस हेडच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने (Austalia) हे आव्हान चार विकेटच्या मोबदल्यात पार केलं.  या पराभवानबरोबरच 140 कोटी भारतीयांचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय चाहते नाराज
विश्वचषकातील पराभवाला आता दोन दिवस उलटून गेले आहेत. पण भारतीय क्रिकेट चाहते अजूनही हा पराभव विसरु शकलेले नाहीत. अंतिम सामन्यात टीम इंडिया गांभीर्याने खेळली नाही असं चाहत्यांना वाटतंय. स्पर्धेच्या पहिल्या लढतीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियााचा पराभव केला होता. त्यामुळे टीम इंडियाचा अतिविश्वास नडला असं चाहत्यांना वाटतंय. देशात काही ठिकाणी क्रिकेट चाहत्यांना आपला रोष व्यक्त केला. अशात अंतिम सामन्यात खेळणाऱ्या भारतीय खेळाडू राहात असलेल्या ठिकाणचे पोलीस अलर्ट मोडवर आहेत. कानपूरमध्ये डिफेन्स कॉलनीत राहणाऱ्या कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 


सामना हरल्यानंतर कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) घरात शांतता पसरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कुलदीपच्या कुटुंबातील एकही व्यक्ती घराबाहेर पडलेली नाही. कुलदीपच्या घराबाहेर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी अलर्ट जाहीर केला आहे. गेल्या दोन दिवसात अनेक क्रिकेट चाहते कुलदीपच्या घराबाहेर जमले होते. तसंच मीडियातल्या लोकांनीही गर्दी केली होती. 


कानपूरमधल्या जाजमऊ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अरविंद सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार कुलदीप यादवच्या घराबाहेबर पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, कुलदीपच्या कुटुंबातल्या लोकांनीही अशी कोणतीही तक्रार केलेली नाही, किंवा सुरक्षेची मागणी केलेली नाही. पण सुरक्षेसाठी पोलिसांचं पथक कुलदीपच्या घराबाहेर तैनात करण्यात आल्याचं अरविंद सिसोदिया यांनी म्हटलंय. 


पीएम मोदी खेळाडूंना भेटले
विश्वचषकात अंतिम सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियातल्या अनेक खेळाडूंना अश्रू अनावर झाले. टीम इंडियाचा कर्णधार  रोहित शर्मा, विराट कोहली आणि मोहम्मद सिराजच्या डोळ्यात मैदानात अश्रू तरळले होते. अशात यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी टीम इंडियाच्या (Team India) ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली आणि खेळाडूंचं सांत्वन केलं.