युवराज, गेलने मिळून ३-४ सामने जिंकले तरीही पैसा वसूल - विरेंद्र सेहवाग
सेहवाग म्हणतो, मला वाटते की गेल्या दहा वर्षातील पंजाबची ही सर्वात चांगली टीम असल्याचेही सेहवागने म्हटले आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रेंचायजी किंग्ज इलेव्हन पंजाबचे मेंटॉर विरेंद्र सेहवागने युवराज आणि गेलबद्धल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. सेहवाग म्हणतो की, युवराज आणि गेल या दोघांनी मिळून ३ ते ४ सामने जरी जिंकून दिले तरी, पैसा वसूल होईल.
आयपीएलचे ११ वे पर्व लवकरच सुरू होत आहे. त्यासाठी पंजाबची टीम जोरदार सरावही करत असून, तिचा आतापर्यंतचा परफॉर्मन्सही चांगला राहिला आहे. दरम्यान, पंजाबने या वेळी संघात बरेच बदल केले आहेत. काही जुन्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत काही नव्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. लिलावादरम्यान, पहिल्यांदा केवळ अक्षर पटेलला घेतले होते. मात्र त्यानंतर मोहित शर्मा, डेव्हिड मिलर, यांसारख्या खेळाडूंना संघाने पुन्हा संधी दिली.
दरम्यान, सेहवागला पूर्ण खात्री आहे की, या वेळी पंजाबचा संघ आयपीएलच्या फायनलपर्यंत जाऊन चषकही जिंकेल. सेहवागने मंगळवारी टीमच्या जर्सीचे लॉन्चिंग केले. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना तो म्हणाला, आम्ही गेल्या काही वर्षात जे काही खेळाडू मैदानात उतरवले त्यातील बरेचसे खेळाडू इतके खास नव्हते. पण या वेळी तसे होणार नाही. मला वाटते की गेल्या दहा वर्षातील पंजाबची ही सर्वात चांगली टीम असल्याचेही सेहवागने म्हटले आहे.