Team India: सूर्यकुमार कर्णधार बनल्यास कोण होणार उप-कर्णधार? `या` खेळाडूंची नावं चर्चेत
Team India: मिळालेल्या माहितीनुसार, टी-20 फॉर्मेटचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याचं नाव पुढे आहे. रोहित शर्मा असताना हार्दिक टीमचा उपकर्णधार होता.
Team India: टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान यानंतर टीम इंडियाच्या टी-20 टीममध्ये मोठे बदल सुरु आहेत. नुकतंच टीम इंडियाला गौतम गंभीरच्या रूपात नवा कोच मिळाला. याशिवाय रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला नवा कर्णधार देखील मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टी-20 फॉर्मेटचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याचं नाव पुढे आहे. रोहित शर्मा असताना हार्दिक टीमचा उपकर्णधार होता. मात्र अचानक टीमचा नवा कोच गौतम गंभीर आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर सूर्यकुमार यादवला कर्णधार करण्याचा विचार करत असल्याचं समोर आलं आहे. मात्र आता प्रश्न असा आहे की, उपकर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती केली जाणार? उप कर्णधार म्हणून या खेळाडूंची नावं चर्चत आहेत.
ऋतुराज गायकवाड
ऋतुराज गायकवाड याने यापूर्वीही टीम इंडियाचं नेतृत्व केलंय. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत तो टीमचा कर्णधार होता. गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारताने सुवर्णपदक जिंकलं होतं. तो सध्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीमपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. त्यामुळे उप कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
संजू सॅमसन
गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये दीर्घकाळ राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सांभाळतोय. त्यामुळे संजू सॅमसन या पदाचा मोठा दावेदार मानला जातोय. त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थान टीम 2022 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. सॅमसनला कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे. याचा फायदा टीमला होऊ शकतो.
जसप्रीत बुमराह
अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह असा खेळाडू आहे ज्याने टेस्टमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. बुमराहने टी-20 मध्येही नेतृत्व केलं आहे. गेल्या वर्षी आयर्लंड दौऱ्यावर तो टीमचा कर्णधार होता. अशा परिस्थितीत त्याचा अनुभव टीमला उपयोगी पडू शकतो.
ऋषभ पंत
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद सांभाळणारा ऋषभ पंतला चांगला अनुभव आहे. त्याने टी-20 मध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. कार अपघातापूर्वी पंत हा भारताचा पुढचा कर्णधार मानला जात होता. मात्र अपघातानंतर अनेक गोष्टी बदलल्या. यानंतर त्याने यावर्षी आयपीएलमध्ये कमबॅक केलं आणि टी-20 वर्ल्डकपमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली.